Omicron : राज्यात आजपासून नवे निर्बंध लागू, कुठे काय नियम असतील? वाचा सविस्तर
मागच्या काही महिन्यांपासून सैल झालेले निर्बंधाचे दोर पुन्हा घट्ट होत आहेत. राज्य सरकारनेही खबरदारी म्हणून पुन्हा काही नवे निर्बंध लावले आहे.
सरत्या वर्षाबरोबर कोरोनालाही निरोप देण्याची चिन्हं दिसत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा तयार होतोय. त्यामुळे मागच्या काही महिन्यांपासून सैल झालेले निर्बंधाचे दोर पुन्हा घट्ट होत आहेत. राज्य सरकारनेही खबरदारी म्हणून पुन्हा काही नवे निर्बंध लावले आहे.
राज्यात काय निर्बंध असतील?
1. रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत महाराष्ट्रात जमावबंदी असेल.
2. लग्नसोहळ्यासाठी बंदिस्त हॉलमध्ये 25 % तर खुल्या जागेत 50 टक्के उपस्थितीला परवानगी असेल.
3. उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती.
4. नाताळ सण आणि थर्टी फर्स्टच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी निर्बंध कडक होणार.
5. ख्रिसमस, न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टीसाठी हॉटेलमधली गर्दी टाळण्यासाठी निर्बंध.
6. दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवास आणि इतर बाबींच्या परवानगीबाबत विचार होण्याची माहिती आहे.
7. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील.
मुंबईच्या चौपाट्यांवरही जमावबंदी लागू
फक्त मुंबईबाबतीत विचार करायचा झाला तर मुंबईतल्या चौपाट्यांवर रात्रीची जमावबंदी लागू झालीय. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर रात्रीची जमावबंदी असेल, जमावबंदीत 5 पेक्षा जास्त लोकं एकत्र येऊ शकणार नाहीत. फटाके फोडता येणार नाहीत. लग्न समारंभ, कार्यक्रमांसाठी आता फक्त 100 जणांनाच परवानगी, याआधी ही मर्यादा 200 लोकांची होती. रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेनेच सुरु राहतील. 3 नोव्हेंबरनंतर काल महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णवाढ झाली. तब्बल दीड महिन्यानंतरच्या मोठ्या रुग्णवाढीनं यंत्रणा धास्तावली आहे. 3 नोव्हेंबरनंतरच्या अनेक दिवशी महाराष्ट्रातली दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या हजारांच्या खाली होती. मात्र काल दिवसभरातल्या रुग्णवाढीचा आकडा बाराशेच्या पुढे गेला. मुंबईतही दिवसााल पुन्हा 500 च्या आसपास रुग्णवाढ होऊ लागलीय.
निर्बंध फक्त महाराष्ट्रात नाही
निर्बंध फक्त महाराष्ट्रात लागतायत असंही नाही. रुग्णवाढ आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये नव्या वर्षांच्या पार्ट्यांवर बंदी घातली गेलीय. कर्नाटकात नव्या वर्षाच्या जल्लोषावर बंदी असणार आहे. मध्य प्रदेशात नाईट कर्फ्यू लागू झालाय. उत्तर प्रदेशातही निर्बंध लागण्याची शक्यता आहे. मुंबईत सार्वजनिक कार्यक्रमांवेळी मर्यादीत संख्येची अट असेल. इतकंच नाही, तर आगामी उत्तर प्रदेशच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात. सभा आणि रॅलींमुळे कोरोना प्रसार वाढू शकतो, असं आवाहन अलाहाबाद हायकोर्टानं सरकारला केलंय… त्यामुळे सरकार कारय निर्णय घेतं, याकडेही सर्वाचं लक्ष लागलंय. दरम्यान, ओमिक्रॉनमुळे भारतात नव्या वर्षात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला गेलाय. ओमिक्रॉनमुळे फेब्रुवारी महिन्यात तिसरी लाट अटळ असेल, असा अंदाज आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय. फेब्रुवारीत दररोज 1 ते दिड लाख रुग्ण सापडण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे ही तिसरी लाट डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच सुरू होईल, असं बोललं जातंय. फेब्रुवारी महिन्यात रुग्णवाढीची सर्वोच्च पातळी गाठली जाईल. दरम्यान, ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनने हैदोस घातलाय आणि भारतात सध्या ओमिक्रॉनचे 356 रुग्ण आढळून आले आहेत.