आधी टूक वाजलं तरी अण्णा हजारे आंदोलन करायचे, पण आता…; रोहित पवारांकडून प्रश्नांची सरबत्ती
Rohit Pawar on Anna Hajare Andolan and Statement About Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे. अण्णांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे. रोहित पवार नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...
2014 पूर्वी अण्णा हजारे यांना काँग्रेस सरकारच्या काळात आपण अनेकदा आंदोलन करताना पाहिलं. छोटं टूक वाजलं तरी अण्णा हजारे आंदोलन करायचे. मात्र भाजप सरकारच्या काळात इलेक्ट्रॉल बॉण्डचा घोटाळा झाला. ॲम्बुलन्स घोटाळा झाला. शेतकरी हवालदिल आहेत. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनलाय. मणिपूरमध्ये आणि महाराष्ट्रात महिलांवरती अत्याचार सुरू आहेत. अशावेळी लोकांची अपेक्षा होती की अण्णा हजारे यांनी आंदोलन करावं. पण पण गेल्या दहा वर्षात त्यांचा एकही शब्द आपण ऐकला नाही. लोकांना अण्णांकडून अपेक्षा असताना ते शांत का?, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. रोहित पवार यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
अण्णांवर टीका
एका बाजूला ते स्वतःला नवीन काळचा गांधी समजतात आणि दुसरीकडे भाजपच्या कार्यकाळात सोयीचं आंदोलन करतात. त्यामुळे त्यांनी एक प्रकारे मुखवटा घातलाय, असंच आपल्याला म्हणावं लागेल, असं म्हणत रोहित पवारांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे. अण्णा हजारे यांनी शरद पवरांच्या टीकेला उत्तर देताना त्यांना 12 वर्षांनंतर जाग कशी आली? माझ्या आंदोलनांमुळे यांचे मंत्री घरी गेल्याचा त्यांना राग असावा, असं अण्णा हजारे म्हणाले. त्यावर प्रत्युत्तर देतांना रोहित पवारांनी टीका केली आहे.
निवडणुकीवर काय म्हणाले?
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी एक व्हीडिओ ट्विट करत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सीसीटीव्ही कॅमेरेबाबत छेडछाडीचा आरोप केला होता. त्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या स्ट्रॉंगरूमला एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा असतांना तिथे एखादी व्यक्ती जातेच कशी? सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीचे ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवलेत ते देखील सीसीटीव्ही बंद झालं होतं. शिरूरमध्ये देखील तसाच प्रकार झाला. जर अशा पद्धतीने निवडणूक आयोगाकडून हलगर्जीपणा होत असेल तर त्यांच्या कार्यपद्धतीबाबत शंका आपण घेऊ शकतो, असं रोहित पवार म्हणाले.
अहमदनगरच्या जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरून रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे जिल्हाधिकारी यांना इशारा दिला. हा जर तुम्ही सत्ताधाऱ्यांचा ऐकत असाल तर उद्या महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर अशा लोकांचं काय करायचं हे आम्ही पाहू असा सज्जड दमच रोहित पवार यांनी दिला.