Sambhaji Bhide | ‘देवेंद्र फडणवीस संभाजी भिडे हा गुरुजी नाही, तो…’ युवा नेत्याने घेतला समाचार
Sambhaji Bhide | काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर आणि विजय वडेट्टीवार या आमदारांनी सभागृहात संभाजी भिडेंवर जोरदार टीका केली. त्यांचा चांगलाच समाचार घेतला.
मुंबई : शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचे पडसाद अजूनही उमटतायत. संभाजी भिडे यांच्यावर जवळपास सर्वच पक्षाच्या नेत्यांनी टीका केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करावी, त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचे महाराष्ट्र विधानसभेतही पडसाद उमटले.
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर आणि विजय वडेट्टीवार या आमदारांनी सभागृहात संभाजी भिडेंवर जोरदार टीका केली. त्यांचा चांगलाच समाचार घेतला.
सचिन खरात काय म्हणाले?
यावर सरकारकडून संभाजी भिडे यांची वक्तव्य तपासून त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल, असं सांगितल गेलय. आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे सचिन खरात यांनी संभाजी भिडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “महाराष्ट्रात संभाजी भिडे सतत भडकाऊ विधान करताना दिसत आहेत. संभाजी भिडे शिव प्रतिष्ठान संघटनेच्या नावाखाली तरुणाची माथी भडकवण्याच काम राज्यात करताना दिसतात” असं सचिन खरात म्हणाले.
‘संभाजी भिडे आधुनिक शकुनी मामा’
“रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रालाच नाही, तर भारताला समानतेचा विचार दिला. पण तो समानतेचा विचार सांगण्याऐवजी संभाजी भिडे तरुणांची माथी भडकवण्याच काम करताना दिसतात. ज्या प्रमाणे शकुनी मामा माथी भडकवण्याचे काम करायचा, तेच काम हे आधुनिक शकुनी मामा संभाजी भिडे करतायत” अशी टीका सचिन खरात यांनी केली.
“देवेंद्र फडणवीस आपणास एक विनंती आहे, संभाजी भिडे हे गुरुजी नसून, आधुनिक शकुनी मामा आहे, हे लक्षात घ्या” असं सचिन खरात म्हणाले. संभाजी भिडे यांना नोटीस
अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडेंना गुन्ह्याच्या संदर्भाने नोटीस पाठवली आहे. पोलीसांनी चौकशीला बोलावल्यास संभाजी भिडेंना पोलिसात किंवा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. आरोपीला अटक करण्यापूर्वी दिली जाते, तशी नोटीस पोलिसांनी दिली आहे.