Pune : राष्ट्रवादीत इनकमिंग वाढले, रूपाली पाटील यांच्यानंतर यांनीही हाती घड्याळ बांधले
रुपाली पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबरच राष्ट्रवादीतील इनकमिंग आणखी वाढले आहे. भाजप, एमआयएम, जनता दल या पक्षांतूनही काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी उपाध्यक्षा रुपाली पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबरच राष्ट्रवादीतील इनकमिंग आणखी वाढले आहे. भाजप, एमआयएम, जनता दल या पक्षांतूनही काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादीतले इनकमिंग मोठ्या प्रमाणात वाढले
मालेगाव शहराध्यक्ष असिफ शेख यांच्या पुढाकाराने भाजपा, जनता दल, एमआयएम या पक्षांमधून अब्दुल माजीद चमडेवाले, अन्सारी अकील, शर्जील अन्सारी, बिलाल बिल्डर, अन्सारी नईम अहमद, अन्सारी शोएब अहमद, सोहेल अख्तर, अबुझर अन्सारी, फरीद अहमद, दरगाही फन्वाद, दरगाही फहाद, अतुल सुर्यवंशी, मन्सूर अख्तर उस्मान गणी, रईस उस्मानी यांनीही राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. त्यामुळे एकाचवेळी डझनभर कार्यकर्ते पदाधिकारी राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.
अजित पवार यांच्याकडून रुपाली पाटील यांचे स्वागत
रुपाली पाटील यांच्याबाबत मनसे पक्षाने दुजाभाव करत त्यांना निवडणूक लढविण्यापासून रोखले. मनसे पक्षाचा प्रभाव पुणे शहरात वाढविण्यासाठी निवडणूक प्रचारसभा घेतल्या होत्या. पण त्यांच्या उल्लेखनीय कामाला डावलले गेले असेही अजितदादा पवार म्हणाले. राष्ट्रवादीत रुपाली पाटीलयांनादेखील पक्ष योग्य ती जबाबदारी देईल, असा विश्वास अजितदादा पवार यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी रुपाली पाटील यांच्यासह लावण्या शिंदे, वंदना साळवी, मनीषा सरोदे, मनिषा कावेडीया, प्राजक्ता पाटील, प्रिया पाटील, निशा कोटा यांचेही अजितदादा पवार यांनी पक्षात स्वागत केले. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील इनकमिंग वाढल्याचे दिसून येत आहे.