नाशिकचे 2 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; मायदेशी आणण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली
रशिया-युक्रेन युद्धाची ठिणगी पडताच नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी तातडीने खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे धाव घेतली. या विद्यार्थ्यांना तात्काळ मायदेशी आणण्यात यावे, अशी मागणी केली. खासदारांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून जलद तोडगा काढू, असे आश्वासन दिले आहे.
नाशिकः रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) युद्धाने (War) जगाला धडकी भरवली आहे. ही तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी होऊ नये, अशी आशा सारेच करतायत. रशियाने युक्रेनवर सुरू केलेले हल्ले अजून तरी थांबवले नाहीत. त्यामुळे अनेक देशवासीय युक्रेन सोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत. तर दुसरीकडे नाशिक (Nashik) येथील दोन विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याचे समोर आले आहे. हे दोघेही विद्यार्थी गंगापूर रोडचे रहिवासी आहेत. त्यांचे सध्या युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण सुरू असल्याचे समजते. या विद्यार्थ्यांना मायदेशी आणावे, अशी साद त्यांच्या कुटुंबांनी घातलीय. तर जिल्हाधिकारी आणि प्रशासनानेही त्यांना भारतात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत.
सध्या कुठे आहेत?
नाशिकची आदिती देशमुखआणि प्रतीक जोंधळे हे विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. खर्कीव्ह प्रांतातील हॉस्टेलमध्ये ते राहतात. त्यांच्यासोबत इतरही भारतीय विद्यार्थी आहेत. रशियाने गुरुवारपासून युक्रेनवर हल्ला सुरू केल्याने इथल्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बेसमेंटमध्ये आश्रय घेतला आहे. त्यांचे त्यांच्या कुटुंबाशी बोलणे झाले आहे. त्यामुळेच या कुटुंबांनी या दोन्ही विद्यार्थ्यांना तातडीने भारतात आणावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
खासदारांचे साकडे
रशिया-युक्रेन युद्धाची ठिणगी पडताच या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तातडीने खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे धाव घेतली. या विद्यार्थ्यांना तात्काळ मायदेशी आणण्यात यावे, अशी मागणी केली. खासदारांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून जलद तोडगा काढू, असे आश्वासन दिले आहे. या विद्यार्थ्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याची मागणीही करण्यात आली आहे. इतर अनेक भारतीय विद्यार्थीही युक्रेनमध्ये अडकले आहेत.
कधी मिळणार दिलासा?
रशिया-युक्रेनचे युद्ध कधी पर्यंत चालणार, रशिया माघार घेणार का, नाटो आणि अमेरिका आक्रमक होणार का, असे नाना प्रश्न सध्या आहेत. भारताने सध्या तरी याप्रकरणी आपली अलिप्ततावादी भूमिका घेतलीय. मात्र, अमेरिकेने पूर्ण पाठिंबा द्यावा. रशियाच्या विरोधात भूमिका घ्यावी, अशी मागणी भारताकडे लावून धरलीय. जगाला संकटाच्या खाईकडे नेणारे हे युद्ध कधी थांबणार, असा सवाल आता निर्माण होत आहे. संबंधित बातम्या :
Russia-Ukraine war: ‘या’ मुद्यावरुन तुम्हाला कळेल रशिया आणि युक्रेनमध्ये का युद्ध सुरु आहे ते?
Ukraine Russia War: रशियाचा युक्रेवर हल्ला, युद्ध आणखीन पेटण्याचा धोका, असंख्य बेघर, शेकडो जखमी!