AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana| भाजपने अयोध्येस चोरांची आळंदी केली, ‘सामना’तून धुलाई; ईडी, सीबीआयला तिथेच कायमस्वरूपी कार्यालय उघडायचा सल्ला

अयोध्येस चोरांची आळंदी करणाऱ्यांना श्रीराम माफ करणार नाहीत. देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही. कारण शिवसेना हिंदुत्वाचा भगवा झेंडा घेऊन उभी आहे, असा इशाराही सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

Saamana| भाजपने अयोध्येस चोरांची आळंदी केली, 'सामना'तून धुलाई; ईडी, सीबीआयला तिथेच कायमस्वरूपी कार्यालय उघडायचा सल्ला
संजय राऊत.
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 10:38 AM

मुंबईः अयोध्येतील भूखंडाचा जो घोटाळा बाहेर आला आहे, तो पाहता भाजपच्या हिंदुत्वात श्रीराम नसून फक्त व्यवहार आहे. त्यांना मंदिर हवे ते बाजूच्या जमिनी लाटण्यासाठी. भाजपवाले चोराच्या आळंदीत घेऊन चालले आहेत. अशा शब्दांत गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून भाजपची यथेच्छ शाब्दिक धुलाई करण्यात आली आहे. त्यामुळे इथून पुढचा शिवसेना आणि भाजपविरुद्धचा राजकीय सामना ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जोरदार रंगणार, यात शंकाच नाही.

शिवसेना हिंदुत्वाचा भगवा झेंडा घेऊन उभी

सामनाच्या अग्रलेखातून भाजपची अक्षरशः पिसे काढण्यात आली आहेत. त्यात म्हटले आहे की, अयोध्येतील भूखंडाचा जो घोटाळा बाहेर आला आहे, तो पाहता भाजपच्या हिंदुत्वात श्रीराम नसून फक्त व्यवहार आहे. त्यांना मंदिर हवे ते बाजूच्या जमिनी लाटण्यासाठी. त्यांचे ढोंग हे असे उघडे पडले की, ही श्रीरामाचीच कृपा म्हणायला हवी. ईडी, सीबीआयने एखादे कार्यालय आता कायमस्वरूपी अयोध्येतच उघडायला हवे. नंतर मथुरा आहे. ‘राम नाम सत्य है’ हे इतरांसाठी. भाजपसाठी फक्त पैसा आणि जमिनी हेच सत्य आहे. लोकांना वाटले देवाच्या आळंदीत जायचे आहे, पण भाजपवाले चोरांच्या आळंदीत घेऊन चालले आहेत. अयोध्येस चोरांची आळंदी करणाऱ्यांना श्रीराम माफ करणार नाहीत. देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही. कारण शिवसेना हिंदुत्वाचा भगवा झेंडा घेऊन उभी आहे, असा इशाराही देण्यात आला आहे.

मंदिराच्या नावावर मलिदा

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, मंदिराच्या नावावर मलिदा लाटणे सुरू आहे. अयोध्येच्या महापौरांनी एक जमीन खरेदी केली. त्यात जमिनीचा व्यवहार लाखांत झाला व तीच जमीन त्यांनी पुढच्या पाच-दहा मिनिटांत रामजन्मभूमी ट्रस्टला 16 कोटींना विकल्याचे प्रकरण समोर आले आहे. महापौर श्री उपाध्याय भाजपचे. प्रभू श्रीरामाच्या नावावरचा हा चोरबाजार. यालाच कोणी हिंदुत्व मानत असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत घातलेलेच बरे, असे म्हटले आहे.

पळ काढणारे वंश पुढे…

इतकेच नाही तर या अग्रलेखातून बाबरी मशिदीबाबतही टोलेबाजी करण्यात आली आहे. त्यात असे म्हटले आहे की, आम्ही बाबरी पाडलीच नाही हो, असे सांगून पळ काढणाऱ्यांचे ‘वंश’ मंदिर परिसरातील इस्टेट एजंट बनले व त्या इस्टेट एजंटांकडे ईडी, सीबीआयचे लक्ष जात नाही हे आश्चर्यच म्हणावे लागेल. राममंदिर लढ्यातील कारसेवकांवर गोळ्या झाडणारे जितके गुन्हेगार आहेत त्यापेक्षा मोठे गुन्हेगार रामंदिर लढ्यातील हौतात्म्याचा हा असा व्यापार करणारे आहेत, अशा शब्दांत समाचार घेण्यात आला आहे.

राज्यातही जमिनी हडपल्या

अग्रलेखात महाराष्ट्रातील जमिनीप्रकरणावरही भाष्य करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे एक जोरदार मंत्री नवाब मलिक यांनीही राज्यातील भाजप नेत्यांनी मंदिराच्या जमिनी कशा हडप केल्या, त्यातून बेनामी पद्धतीने कोट्यवधींचे व्यवहार कसे केले ते उघड केले आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तीन मुस्लिम देवस्थाने आणि सात हिंदू देवस्थानांची 513 एकर जमीन भाजपच्या नेत्यांनी हडप केली आहे. कागदपत्रांत फेरफार करून हजारो कोटींचा घोटाळा केला, असा आरोप मलिक यांनी केला आहे. जमिनी लाटण्याचे एक तंत्र आहे व भाजप पुढाऱ्यांच्या ‘रोखशाही’ने हे तंत्र विकसित केले आहे, अशा शब्दांत समाचार घेतला आहे.

इतर बातम्याः

Railway canceled | दुष्काळात तेरावा…ऐन एसटी संपात भुसावळ विभागात मध्य रेल्वेच्या 18 गाड्या रद्द

Farmers rights| नाशिक विभागात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी विशेष मोहीम…विभागीय आयुक्तांचे आदेश…हे महत्त्वाचे 5 लाभ