शेगावमध्ये संत गजानन महाराज प्रगटले? कोण आहे ती व्यक्ती?
खामगाव शहरात कथित गजाजन महाराज प्रकटल्याची जोरदार चर्चा सुरु झालीय. तीन दिवस या महाराजांचे शेगावमध्ये वास्तव्य होते. ही व्यक्ती शहरातून सायकल घेऊन फिरत होती. लोकांचे भविष्य सांगत होती.
गणेश सोळंकी, बुलढाणा : 3 ऑक्टोबर 2023 | बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील शेगाव हे संत गजाजन महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेले श्री क्षेत्र शेगाव. गजानन महाराजांनी ८ सप्टेंबर १९१० रोजी येथे समाधी घेतली. तेथे आज संगमरवरी पादुका आहेत. तर त्यामागे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. या जागेला समाधीस्थळ म्हणतात. भारतातील कानाकोपऱ्यातून हजारो भक्त येथे येतात. समाधीचे दर्शन घेतात आणि संतचरणी नतमस्तक होतात. याच शेगावमध्ये पुन्हा एकदा गजानन महाराज प्रगटले अशी चर्चा सुरु झाली आहे.
खामगाव शहरातील सुटालपुरा भागात अशोक सातव यांच्या घरी हे कथित गजानन महाराज प्रकटले. हुबेहूब गजानन महाराज यांच्यासारखी ती व्यक्ती दिसत होती. वाऱ्यासारखी ही बातमी जिल्ह्यात पसरली. सातव यांच्या घरी लोकांची गर्दी होऊ लागली. नागरिक त्यांची आरती, पूजा करू लागले. या परिसरात त्या व्यक्तीने तीन दिवस वास्तव्य केले.
गजानन महाराज यांच्यासारखी दिसणारी ही व्यक्ती शहरातून सायकल घेऊन फिरत होती. शहरातील काही नागरिकांनी त्यांना त्यांच्याबद्दल माहिती विचारली. पण, त्यांनी खरी माहिती दिली नाही. ‘मला महाराजांना पाठविले आहे. मी महाराजांचा अवतार आहे’, असेच ती व्यक्ती सांगायची.
शहरात फिरताना ती व्यक्ती कोणाला म्हणायची ‘तुमचे भले होईल’, ‘दोन बायका मिळतील’, ‘तुम्ही पैशात खेळणार’. असे भविष्य वर्तवून ती व्यक्ती करायची. मात्र, त्याचे हे उद्योग पाहून काही व्यक्ती संतापल्या. त्यांनी त्या महाराजांना खामगाव शहरातून हाकलून दिले. तेव्हापासून ही व्यक्ती कुणाला दिसलेली नाही.
कथित गजानन महाराज प्रगटले अशी चर्चा जिल्ह्यात सुरु झाली. पण, स्वतःला गजानन महाराज म्हणून घेणारे ती व्यक्ती नेमकी कोण? हे अद्यापही समजलेले नाही. यावर अनिसने प्रश्न उपस्थित केला आहे. अशा बहुरूपी व्यक्तीवर कारवाई होणे गरजेचे आहे असे मत अनिसने व्यक्त केलंय.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष शिवाजी पाटील यांनी अशा व्यक्तीवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार कारवाई होणे गरजेचे आहे अशी मागणी केलीय. मात्र, ती व्यक्ती कोण आहे? कुणी बहुरूपी आहे का? ती अशा अवस्थेत का फिरत होती?असे प्रश्न खामगावमधील नागरिकांना सध्या भेडसावत आहेत.