‘साहेब, वेगळा निर्णय घ्या’, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांची भुजबळांकडे मागणी, राष्ट्रवादीची धाकधूक वाढवणारी बातमी
छगन भुजबळ यांच्यासोबत समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मुंबईच्या वांद्रे येथे ही बैठक पार पडली. ही बैठक जवळपास चार ते साडेचार तास चालली. या बैठकीत समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी छगन भुजबळ यांच्याकडे वेगळा निर्णय घेण्याची मागणी केली.
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी वेगळी भूमिका घ्यावी, अशी मागणी समता परिषदेच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लोकसभा आणि राज्यसभेत डावलल्यामुळे भुजबळांनी वेगळा विचार करावा, असं समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना वाटतंय. कार्यकर्त्यांनी ही आग्रही विनंती छगन भुजबळ यांच्याकडे केली, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भुजबळांच्या समोरच समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी ही मागणी केल्याचं सूत्रांकडून कळत आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ काय भूमिका घेतात? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीच्या वेळी नाशिकच्या जागेसाठी आग्रही होते. पण त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यानंतर शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना तिकीट मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांची नाराजी असल्याची चर्चा होती. तसेच आता नुकत्याच राज्यसभेवर खासदान सुनेत्रा पवार यांची वर्णी लागण्याआधी छगन भुजबळ हे इच्छुक होते. त्यांना राज्यसभेची संधी न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज असल्याची पुन्हा चर्चा सुरु झाली. या सर्व घडामोडींनंतर आज समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत छगन भुजबळ यांची बैठक पार पडली.
समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची नेमकी मागणी काय?
छगन भुजबळ यांच्यासोबत समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मुंबईच्या वांद्रे येथे ही बैठक पार पडली. ही बैठक जवळपास चार ते साडेचार तास चालली. या बैठकीत समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी छगन भुजबळ यांच्याकडे वेगळा निर्णय घेण्याची मागणी केली. आपल्यावर अन्याय झाला आहे. वेगळा निर्णय घ्या. ओबीसी आरक्षणाला धक्का देवून सरकार मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्याच्या तयारीत आहे. त्याबाबतीतही आपल्यावर अन्याय होतोय. त्याचबरोबर लोकसभेतही आपल्याला डावललं गेलं आहे. त्यामुळे आता वेगळा विचार करण्याची गरज आहे. तुम्ही वेगळा विचार करा आणि निर्णय घ्या. आपल्यासाठी सध्या सर्वकाही ठिक नाही. त्यामुळे वेगळा विचार करा. हीच ती वेळ आहे, अशी मागणी समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली.
छगन भुजबळ काय म्हणाले?
दरम्यान, या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “तुम्ही रोज भेटता. मी म्हणालो का तुम्हाला की मी नाराज आहे म्हणून? अरे राजकारणात, पक्षामध्ये काही गोष्टी मिळतात तर काही गोष्टी मिळत नाहीत. ते पाहून पुढे जायचं असतं. आज नाही तर उद्या होतं. आपण काम करत राहायचं”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.