संभाजी भिडेंना कुत्रा चावल्यानंतर महानगरपालिका खडबडून जागी, राबवली भटके कुत्र्यांना पकडण्याची मोहीम
संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतल्यानंतर सांगली शहरातील कुत्रे पकडण्याची मोहीम पालिकेने सुरू केली आहे. ज्या भागात संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतला होता त्या परिसरात महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे उर्फ भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सांगलीमध्ये घडलेल्या या घटनेनंतर महापालिकेला जाग आली आहे. सांगली शहरातील कुत्रे पकडण्याची मोहीम पालिकेने सुरू केली आहे. ज्या भागात संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतला होता त्या परिसरात महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली आहे.
सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने सोमवारी रात्री हल्ला केला होता. कुत्र्याने त्यांच्या डाव्या पायाचा चावा घेतला होता. शहरातील माळी गल्लीत हा प्रकार घडला होता. त्यानंतर शासकीय रुग्णालयात संभाजी भिडे गुरुजींवर उपचार करण्यात आले. या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून शहरातल्या भटके कुत्र्यांना पकडण्यात येत आहे. या घटनेनंतर सांगली मनपा अॅक्सन मोडमध्ये आली आहे. मनपाने शहरातल्या विविध भागात कुत्रे पकडण्याची मोहीम सुरु केली आहे.
दरम्यान, संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचे समर्थन केले होते. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, असे त्यांनी म्हटले होते. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरुन वाघ्या कुत्र्याचे स्मारक काढण्याची मागणी केली होती.




कोण आहेत संभाजी भिडे
संभाजी भिडे यांचे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या संख्येने समर्थक आहेत. पुणे, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, मुंबई आणि सातारा येथील अनेक लोक त्यांना मानतात. त्यांनी ‘शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संस्थेची स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी शिकवायला सुरुवात केली. त्यांचे सर्वच पक्षांतील राजकारण्यांशी संबंध होते. परंतु ते राजकारणात आले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संभाजी भिडे यांचेही चांगलेच संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संभाजी भिडे यांना गुरुजी म्हणतात. उदयनराजे भोसले, शरद पवार यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही संभाजी भिडे यांच्याशी चांगले नाते होते. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांचेही त्यांच्याशी जवळचे नाते राहिले आहे.