Sanjay Shirsat : आम्ही कुणावर दबाव टाकणार नाही पण…; दसरा मेळाव्याबाबत संजय शिरसाट काय म्हणाले?
Shivsena MLA Sanjay Shirsat on Dussehra Melava : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. डोक्यावर परिणाम झालाय. जग त्यांचा निषेध करतंय, असं म्हणत संजय शिरसाट यांनी पुन्हा तोफ डागली आहे. तसंच दसरा मेळाव्यावरही त्यांनी भाष्य केलंय.
दत्ता कानवटे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर | 10 ऑक्टोबर 2023 : दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवर आहे. अशातच शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट आग्रही आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजी पार्कवर मेळावा व्हावी ही आमची इच्छा आहे. सरकार म्हणून आम्ही कुणावर दबाव टाकला नाही.आम्हाला परवानगी दे हे कमिशनरला म्हणायला वेळ लागणार नाही. पण आम्हाला परवानगी मिळाल्यास जर कुणी कोर्टात गेले तर आम्ही पर्यायी म्हणून 2 ते 3 जागा पाहिल्या आहेत, असं संजय शिरसाट म्हणालेत.
ठाकरे गटाने दसरा मेळावा घेतला नाही. तरी त्यांना काही फरक पडत नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी जिथं भूमिका घेतली असेल. तिथंच सभा होईल. शिवसैनिकांनी एकमेकांना दगड मारणं अपेक्षित नाही. आपल्यात भांडण लावून हे डोम कावळे पाहत राहतील. दोष शिवसैनिकांचा नाही तर नेत्यांना आहे, असं म्हणत शिरसाट यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.
संजय राऊत यांच्या डोक्यावर झाला परिणाम आहे. जग ज्याचा निषेध करतो. दहशत माजवणारा आणि इंदिरा गांधी यांचे भाऊ बहिणीचे संबंध असतील. तर हे उद्या ठाकरे गटाला विसरले असतील. काश्मीर आणि इंदिरा गांधी यांचे काय नाते होते हे सर्वांना माहीत आहे, असंही शिरसाट म्हणालेत.
आगामी लोकसभा निवडणुकीवरही संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे. आम्हाला इतरांसारखी पंतप्रधानपदाची आणि मंत्रिपदाची स्वप्न पडत नाहीत. आमची पूर्ण ताकत लोकसभेत मोदी सरकार मजबूत करण्यात आम्ही लावणार आहोत. केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी सरकार येणार आहे. लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे, असं संजय शिरसाटांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचं प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आहे. यावर कालच सुनावणी झाली आहे. यावरही संजय शिरसाट यांनी भाष्य केलं. राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह आणि नाव अजितदादांच्या गटालाच मिळेल, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय.