मराठा समाजाच्या बैठकीत राडा का झाला? मनोज जरांगे पाटील यांची सविस्तर प्रतिक्रिया
मराठा समाजाच्या बैठकीत आज राडा झाला. या राड्याचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याच्या विचारात आहेत. त्यासाठीच ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पण या बैठकीत तुफान राडा झाला. अखेर या प्रकरणात पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार राडा झाला. लोकसभा निवडणुकीत उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळेला एका व्यक्तीने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं नाव घेतल्याने वाद सुरु झाला. त्याचवेळी संतप्त झालेल्या जमावाने विकी पाटील या तरुणाला मारहाण केली. त्यामुळे बैठकीत काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. या राड्यावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आलीय. मराठा नेते मनोज जरांगेंच्या सूचनेनुसार उमेदवार ठरवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं. 60 ते 70 जणांच्या उपस्थितीत बैठक शांततेत सुरू होती. मात्र अचानक आरोप प्रत्यारोप सुरु झाले. काही कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत खैरेंकडून पैसे घेऊन बैठक आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपानंतर बाळू औताडे या तरूणाकडून विकी पाटील या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली.
मारहाणीनंतर बैठक उधळली आणि पुढे बराच वेळ राडा सुरू होता. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. बैठकीत राडा झाल्यानं उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली. राड्यानंतर महाराष्ट्रातून उमेदवार उभे करण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बैठकीत चंद्रकांत खैरेंची सुपारी घेऊन काही कार्यकर्ते आल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या सर्व प्रकाराबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं खैरेंनी म्हटलंय.
मराठा समाज मोठा असल्यामुळे भांड्याला भांड लागतं. मात्र, ज्या दोघांमध्ये वाद झाला त्यांना बोलावून वाद मिटवू असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं. तर काही लोक बैठकीत आपआपल्या पक्षाचा रेटा लावत असल्यानं वाद झाल्याचं मराठा समन्वयक विनोद पाटलांनी म्हटलंय.
मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
“भांड्याला भांडं लागतच असतं. त्यावर लगेच भूमिका घ्यायची गरज नाही. पण आम्ही दोघी बांधवांना बोलवून घेऊ. त्यांचा काय विषय आहे ते समजून घेऊ. दोघांना बोलवून घेऊ. मार्ग निघणार. समाज एकत्र आहे. समाज तुम्हाला एकत्रित दिसणार आणि एकत्र राहणार. आपले मते जर ग्राह्य धरली जात नसले, आपली किंमत केली जात नसली, तर आपल्याला एका टोकाच्या भूमीवर यावं लागतं. नाही जिंकत ना आम्ही, तर आम्ही तुमचे पाडू शकतो ही शक्ती मराठे यावेळेस दाखवणार आहेत. मग त्यांना कळेल की, आपण हा नसता जाळ अंगावर घेतला आहे”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेवर दिली आहे.