मोठी बातमी : सांगलीतील 2 बड्या नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश; महिनाभरात दादागटात इन्कमिंग वाढण्याचाही दावा
NCP Ajit Pawar Group : सांगलीतील बड्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. महिनाभरात दादा गटात इन्कमिंग वाढण्याचाही दावा या नेत्यांनी केला आहे. तसंच अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास सुरू आहे. अजिदादांचं नेतृत्व खंबीर आहे, त्यासाठी आपण अजित पवार यांच्यासोबत जात असल्याचं या नेत्यांनी म्हटलंय.
शंकर देवकुळे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, सांगली | 09 डिसेंबर 2023 : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर अजित पवार यांच्या भूमिकेला राष्ट्रवादीतील आमदारांनी पाठिंबा दिला. अनेकांनी अजित पवार यांना आपला पाठिंबा दिला. अशातच अजित पवार गटातील इन्कमिंग अजूनही सुरुच आहे. सांगलीतील दोन बड्या नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. तसंच येत्या महिन्याभरात अनेक नेते अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत येणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. शरद पवार गटाचे नेते वैभव पाटील आणि माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. वैभव पाटील यांच्यावर अजित पवार गटाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दोन नेत्यांचा अजितदादा गटात प्रवेश
आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आता नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. पक्षाकडून पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना नक्की ताकद आणि पाठबळ मिळणार आहे, अशी भूमिका अजित पवार गटाचे नवनिर्वाचित सांगली जिल्हा अध्यक्ष वैभव पाटील यांनी मांडली आहे. सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेत शहर जिल्हा अध्यक्ष प्रा पद्माकर जगदाळे आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील बोलत होते.यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी उघडपणे अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
दादांच्या सोबत जाण्याचा निर्णय का?
ग्रामीण भागात अनेक प्रश्न आहेत, यापूर्वी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कुणाला तर सांगावं लागत होतं. मोठे उद्योगधंदे यावेत, रस्त्यांचे कामे व्हावीत, प्रलंबित असणारे विकासाचे प्रश्न सोडवावेत यासाठी राज्यात सध्या सक्षम नेतृत्व असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम सुरू आहे. प्रत्येक तालुक्यात जावून पक्षबांधणी केली जात आहे. त्यासाठी कार्यकारणी निवड केली जात आहे. येत्या महिन्याभरात अनेक नेते राष्ट्रवादीत येणार आहेत. जिल्ह्यात सर्वत्र पक्षाची बांधणी सुरू असून निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या नेत्याला विधानसभेची उमेदवारी मिळणार आहे, अशी माहिती ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी दिली.
वैभव पाटील आणि दिग्विजय सूर्यवंशी यांच्या पक्षप्रवेशावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी उघडपणे अजित पवार गटात प्रवेश केला यावेळी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष प्रा पद्माकर जगदाळे माजी नगरसेवक अख्तर नायकवडी, अविनाश चोथे, अॅड.अमित शिंदे हे उपस्थित होते.