पुरात बुडालेल्या शहराची दाहकता हळूहळू समोर, रस्त्यावरील गाड्या चिखलाने माखल्या, अनेक वाहने सडली
आठवडाभर पुराच्या पाण्याने वेढलेल्या सांगलीची दाहकता हळूहळू समोर येत आहे. पुराचं पाणी आता हळूहळू ओसरत आहे, त्यानुसार पुरात काय काय बुडालं होतं, ते दिसत आहे
सांगली : आठवडाभर पुराच्या पाण्याने वेढलेल्या सांगलीची दाहकता हळूहळू समोर येत आहे. पुराचं पाणी आता हळूहळू ओसरत आहे, त्यानुसार पुरात काय काय बुडालं होतं, ते दिसत आहे. सामान्य रस्त्यावर 7 ते 8 फुटापर्यंत पाणी भरल्याने बुडालेल्या वस्तूंची तीव्रत समजत नव्हती.
आता पाणी ओसरल्यानंतर चिखलाने माखलेली वाहने, गाळ, कचरा भरलेले रस्ते, घरं, दुकानं दिसत आहेत.
सांगलीमधील गणपती पेठमधील पाणी ओसरल्यानंतर भयावह दृश्य समोर आलं. शेकडो चारचाकी, असंख्य दुचाकी वाहने ज्या जागी लावली होती, त्याच जागी पुराच्या पाण्यात बुडाली होती. मात्र पाणी ओसरल्यानंतर ही वाहने पूर्ण चिखल-गाळाने माखलेली पाहायला मिळत आहेत. काही गाड्यांवर शेवाळ साचलं आहे. काही वाहने अक्षरश: सडल्यासारखी दिसत आहेत.
अनेक गाड्यांमध्ये बिघाड झाला आहे, काहींची दुरुस्ती होऊ शकते तर काहींना भंगाराशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या पुराने कोट्यवधीचं नुकसान झालं आहे. सांगलीतील पुराने अनेकांचं अतोनात नुकसान केलं. बहुतेकांच्या घरातील सगळं साहित्य वाहून गेलं. त्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले.