अंत्यसंस्काराचं तुमचं तुम्ही ठरवा, वृद्धेच्या निधनानंतर मुलांनी पाठ फिरवली, सामाजिक कार्यकर्त्यांकडून मुखाग्नी
वृद्धेच्या मृत्यूनंतर मुलांना फोन केला असता "आम्हाला काही सांगू नका, तुमचं तुम्ही काय करायचं ते ठरवा" असं कोरडं उत्तर आलं. (Sangli Old Lady last rites)
सांगली : वृद्ध मातेच्या अंत्यसंस्काराकडे पोटच्या मुलांनी पाठ फिरवली, मात्र सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी स्वखर्चातून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ही मन हेलावणारी घटना घडली आहे. मुलांच्या कृतघ्नतेचा धक्का बसलेला वृद्धेचा पतीही यावेळी माणुसकीच्या दर्शनाने गहिवरला. (Sangli Old Lady Social Workers perform last rites as children denies)
जतमध्ये राहणाऱ्या वयोवृद्ध आजीबाईंना त्रास होऊ लागल्यामुळे जत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची प्रकृती आणखी बिघडू लागल्यामुळे सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आजींसोबत कोणीही नातेवाईक येण्यास तयार नव्हते.
गाडीतच वृद्धेचा अखेरचा श्वास
अखेर आजींचे वयोवृद्ध पती गाडीत बसले. सांगलीजवळ आल्यानंतर त्या वयोवृद्ध महिलेचं निधन झालं. यावेळी योगेश बाबा यांनी त्यांच्या नातेवाईकांना आणि मुलांना फोन केला. त्यावर “आम्हाला काही सांगू नका, तुमचं तुम्ही काय करायचं ते ठरवा” असं कोरडं उत्तर आलं.
सामाजिक कार्यकर्ते मदतीला
“काय करायचं बाबा, माझी परिस्थिती नाही. माझ्या पत्नीवर अंत्यसंस्कार कर, तुला पुण्य लागेल” असं म्हणत आजोबा रडू लागले. त्यावेळी योगेश बाबा यांनी स्वखर्चातून आजींवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, माजी नगरसेवक परशुराम मोरे, अमित बिज्जरगी मालक, माजी नगरसेवक महादेव कोळी, नगरसेवक टिमू एडके आणि नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
आजोबांना अश्रू अनावर
पत्नीवर अंत्यसंस्कार करताना वयोवृद्ध आजोबांचे डोळे अक्षरशः पाणावले होते. योगेश बाबा, तू आम्हाला देवाच्या रुपात भेटलास. तुला उदंड आयुष्य लाभो, असे म्हणत वयोवृद्ध आजोबांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली आणि योगेश बाबांसमोर दोन्ही हात जोडले.
संबंधित बातम्या :
(Sangli Old Lady Social Workers perform last rites as children denies)