Sambhaji Chhatrapati : संभाजीराजेंना भाजपनेच सापळ्यात अडकवले, हा त्यांचा जुनाच धंदा; राऊतांचा हल्लाबोल
कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप उडी कशी मारली नाही? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता, पण फडणवीस यांनी लोकांची निराशा केली नाही.
मुंबई: संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांना दिलेला शब्द मोडला. हा शब्द वगैरे देताना फडणवीस (devendra fadnavis) तेथे हजर नव्हते. शिवसेना व संभाजीराजे यांच्यात जे घडले ते चार भिंतींतले आहे. शिवसेना राज्यसभेच्या दोन जागा लढवणार आहे व संभाजीराजांनी अपक्ष न लढता शिवसेनेचा उमेदवार व्हावे एवढय़ापुरतीच ही चर्चा मर्यादित आहे. दोघांत राजकीय व्यवहार जमला नाही, मग तो भाजपशी तरी जमला का?, असा सवाल करतानाच संभाजीराजे फडणवीस यांना भेटले व पाठिंब्यासाठी विनंती केली. तेव्हा ”आम्ही संभाजीराजांना पाठिंबा देतोच” असे फडणवीस म्हणाले नाहीत. त्यांनी राजेंना कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. ”विचार करू”, ”वरच्यांना विचारून निर्णय घेऊ” अशी थातूरमातूर उत्तरे त्यांनी दिली. त्यामुळे सहाव्या जागेसाठी अपक्ष लढू पाहणाऱया संभाजीराजेंना भाजपनेच सापळ्यात अडकवले. हा त्यांचा जुनाच धंदा आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केली आहे.
दैनिक सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी फडणवीसांवर ही टीका केली आहे. शरद पवार यांनी आधी संभाजीराजांना पाठिंब्यासाठी घोषणा केली आणि नंतर त्यांनी घूमजाव करत पाठिंबा काढून घेतला असे फडणवीस सांगतात. ही ‘मोदी स्कूल’ची लोणकढी थाप आहे. उलटपक्षी संभाजीराजे यांची कोंडी करायला सुरुवात केली ती भाजपनेच. राज ठाकरे यांच्या खांद्यावर ‘भोंगा’ लावून त्यांची कोंडी केली. पुढे त्यांच्या अयोध्या दौऱ्यास उत्तेजन देऊन पुन्हा आपल्याच खासदाराकडून जोरदार विरोध करायला लावला व एकप्रकारे मोठी कोंडीच निर्माण केली. हाच त्यांचा राजकीय पॅटर्न असतो. शिवसेना असे कधीच करत नाही. जे करायचे ते समोर, बोलायचे तोंडावर. त्यामुळे सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंची कोंडी केली हे फडणवीसांचे वक्तव्य फसले आहे. फडणवीस व त्यांचे लोक सांगतात, आम्ही राजेसाहेबांना राज्यसभेची एक जागा दिली (राष्ट्रपती नियुक्त). ही जागा तुमच्या खिशातून दिली नाही, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
अग्रलेखातून हल्लाबोल
- शिवसेनेला बदनाम करण्यासाठी संभाजीराजेंच्या विषयाला फोडणी देणे हे घाणेरडे राजकारण आहे. पण कोल्हापूरच्या मातीतले सत्य अद्याप मेले नाही व छत्रपती शाहू घराण्याची सचोटी संपली नाही हे आता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनीच दाखवून दिले.
- कोल्हापूरच्या राजवाड्यात पत्रकारांना बोलावून त्यांनी सांगितले, राज्यसभेच्या जागेचा जो प्रकार झाला, त्यामुळे छत्रपती घराण्याचा अपमान झालेला नाही. शिवसेनेने छत्रपती घराण्याचा सदैव मान राखला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला असे वाटत नाही. हे सर्व भाजपवाल्यांचेच घाणेरडे राजकारण चालले आहे. असे परखड मत छत्रपती शाहूंनीच मांडल्यावर फडणवीस यांचीच कोंडी झालेली दिसते. फडणवीस यांनी संभाजी छत्रपती प्रकरणात उडी घेतली, पण उडी फसली हे स्पष्ट झाले.
- कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप उडी कशी मारली नाही? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता, पण फडणवीस यांनी लोकांची निराशा केली नाही. त्यांनी या विषयावर आपली क्रांतिकारक मते मांडली आहेत. आधी पाठिंबा द्यायचा आणि नंतर तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने संभाजीराजे यांची ठरवून कोंडी केली असे फडणवीस बोलू लागले आहेत. फडणवीसांची वक्तव्ये आता कोणी गांभीर्याने घेत नाहीत. शब्द द्यायचा व नंतर वेळ येताच मोडायचा हे भाजपलाच चांगले जमते. 2014 आणि 2019 साली महाराष्ट्रात जे शब्द फिरवण्याचे खेळ झाले, त्याचा अनुभव गाठीशी असलेले फडणवीस इतरांच्या शब्दमोडीवर प्रश्न विचारतात हे आश्चर्यच आहे.
- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत भाजप नेतृत्वाने दिलेला शब्द कसा मोडला हे संपूर्ण देश जाणतो. पंचवीस वर्षांच्या युतीनंतरही शब्द मोडणाऱयांनी याबाबत प्रवचने झोडावीत यास काय म्हणायचे! कोंडी झाली म्हणजे काय हे आधी फडणवीस यांनी ‘मराठी शब्दरत्नाकरा’चा अभ्यास करून समजून घेतले पाहिजे. 2019 साली ”मी पुन्हा येईन” असे सांगणाऱया फडणवीसांना पुन्हा येताच आले नाही. तेव्हापासून सुरू झालेली स्वतःची कोंडी त्यांना फोडता आलेली नाही.
- राष्ट्रपती नियुक्त 12 जागांचे वाटप हे सत्ताधारी पक्षाच्याच हातात असते व मर्जीतल्या लोकांना त्या दिल्या जातात. महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त 12 जागा आहेत. त्या जागा फडणवीस व त्यांचे राज्यपाल यांनी अडीच वर्षे दाबून ठेवल्या आहेत. तुम्ही तुमच्या जागा मनाप्रमाणे वाटायच्या व इतरांच्या तोंडचा घास खेचून घ्यायचा हे सरळ सरळ ढोंग आहे. महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे काम भाजप व त्यांच्या लोकांनी सुरू केले आहे. दुधात मिठाचा खडा टाकण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. भाजपला ‘कोथळा’ शब्दाची ऍलर्जी आहे; पण सापळा, कोंडी हे त्यांचे आवडते शब्द दिसतात. संभाजीराजे प्रकरणात ते पुन्हा दिसले.