संजय राऊतांचा नाशिक दौरा अखेर ठरला! डॅमेज कंट्रोलसाठी राऊत नाशिकच्या रिंगणात
गेल्या अनेक महिन्यांनंतर संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येत आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक होण्यापूर्वी काही दिवस अगोदर संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले होते.
नाशिक : नाशिकमधील ठाकरे गटाचे 12 नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या चर्चा सुरू असतांना ठाकरे गटाचे खासदार शिवसेना संजय राऊत यांनी दौरा नियोजित केला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी जामीनमिळाल्यानंतर पाहिला दौरा नाशिकला करणार असल्याचे जाहीर केले होते, त्यातच शिंदे गटात ठाकरे गटाचे 12 नगरसेवक जाण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे संजय राऊत यांचा दौरा जाहीर झाल्याने ठाकरे गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 1 डिसेंबरला संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येणार असून 2 डिसेंबरला पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती आणि सायंकाळी मेळावा घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नाशिकमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत तयारी सुरू केली असून निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार हजेरी लावणार असल्याचे चित्र सध्या आहे.
गेल्या अनेक महिन्यांनंतर संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येत आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक होण्यापूर्वी काही दिवस अगोदर संजय राऊत नाशिक दौऱ्यावर होते.
जवळपास चार महिन्यांनी संजय राऊत नाशिकला येणार आहे, त्यांच्या उपस्थितीत महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि इच्छुक उमेदवारांच्या वन टू वन मुलाखती घेणार असल्याची माहिती आहे.
यामध्ये शिवसेनेत फुट पडल्यानंतर भुसे, कांदे आणि गोडसे यांचाही मेळाव्यात समाचार घेणार असून याशिवाय नाशिकमधून फारसे कुणी शिंदे गटात न गेल्याने त्याचाही आधार घेत राऊतांची फटकेबाजी पाहायला मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे गटातील 12 माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या चर्चा आहे, दोनदा दिलेल्या तारखाही रद्द झाल्याने प्रवेशाच्या अफवाच असल्याचे बोललं जात आहे, त्यामुळे राऊत यांचा दौरा डॅमेज कंट्रोलसाठी असणार हे निश्चित आहे.