मी भाजपातून निवडून आलो, भाजपातच राहणार; खडसे समर्थक आमदाराचं स्पष्टीकरण
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना लवकरच भाजपमधील आपले समर्थक राष्ट्रवादीत येणार असल्याचा दावा केला होता. (Sanjay Savkare denied to join ncp)
भुसावळ: माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना लवकरच भाजपमधील आपले समर्थक राष्ट्रवादीत येणार असल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांचा हा दावा पोकळ ठरताना दिसत आहे. खडसे समर्थक म्हणून ओळखले जाणारे आमदार संजय सावकारेही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. सावकारे यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्त शहरात लावलेल्या पोस्टरवरील खडसेंच्या फोटोने या चर्चेला बळही मिळालं होतं. पण सावकारे यांनीच आपण भाजपमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. (Sanjay Savkare denied to join ncp)
संजय सावकारे हे भुसावळचे आमदार आहेत. ते एकनाथ खडसे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. सावकारे यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक भुसावळमध्ये लावण्यात आले आहेत. या फलकावर सावकारे आणि खडसेंचे फोटो होते. त्यामुळे सावकारे भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर सावकारे यांनीही सारवासारव केलीय. वाढदिवासाचे फलक लावताना संबंधितांनी कुणाचा फोटो लावावा हे मी सांगू शकत नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे या विषयावर गैरसमज करणं चुकीचं आहे. मी भाजपातून निवडून आलो असून भाजपमध्येच राहणार असल्याची स्पष्टोक्ती सावकारे यांनी दिलीय.
महाजनांचा फोटो गायब
सावकारे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने शहरात पोस्टर्स, होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्यावर फक्त खडसे आणि सावकारे यांचेच फोटो होते. भाजप नेते गिरीश महाजन यांचा फोटो या पोस्टरवरून गायब होता. विशेष म्हणजे सावकारे समर्थकांनी वर्तमानपत्रांनाही जाहिराती दिल्या आहेत. त्यातही खडसे आणि सावकारे यांचे फोटो होते, पण महाजन यांचा फोटो नव्हता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पोस्टरवर फोटो देताना समर्थकांकडून चूक होऊ शकते, पण वर्तमानपत्रात जाहिरात देताना चूक कशी होऊ शकते? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. (Sanjay Savkare denied to join ncp)
एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसेंनी राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधल्यानंतर त्यांचे समर्थक असलेल्या भाजपातील पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. भुसावळचे आमदार सावकारे खडसेंचे निकटवर्तीय असल्याने त्यांचे नाव देखील या चर्चेत आघाडीवर होते. मात्र, आता सावकारे यांनीच त्यावर खुलासा केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. (Sanjay Savkare denied to join ncp)
VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या pic.twitter.com/zmE4geSb6R
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 8, 2021
संबंधित बातम्या:
जळगावातील भाजप आमदाराच्या पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो
फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही, खडसेंचा हल्लाबोल
बीएचआर घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही; खडसेंच्या इशाऱ्यानंतर गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण
(Sanjay Savkare denied to join ncp)