‘लफडं’ हा शब्द मी यासाठी, ‘यांच्या’साठी वापरला, संजय शिरसाट यांचं टीव्ही 9वर स्पष्टीकरण
मी केलेल्या वक्तव्याची चौकशी करायची असेल तर खुशाल करा, पण मी तो शब्द सुषमा अंधारेंसाठी वापरलाच नव्हता असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय.
मुंबई : ठाकरे समर्थित शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर टीका करताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी वापरलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. महाविकास (Mahavikas) आघाडीतील महिला नेत्या आक्रमक झाल्या असून महिला आयोगाकडूनही संजय शिरसाट यांना नोटीस बजावण्यात येऊ शकते. मात्र सुषमा अंधारे यांच्यासाठी ते शब्द वापरलेच नव्हतं, असं स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिलंय. काय काय लफडी आहेत, तिचं तिलाच माहिती… असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं होतं. मात्र तो शब्द मी आर्थिक घोटाळ्यांकरिता वापरला होता, असं स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी टीव्ही 9 शी बोलताना दिलंय.
काय म्हणाले संजय शिरसाट?
संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंविषयी बोलताना केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर तुफान चर्चेचा विषय ठरलंय. महिला आयोगानेही याची दखल घेतली आहे. मात्र यातील लफडं हा शब्द मी आर्थिक घोटाळ्यांसाठी वापरला. माझ्या दोन मंत्र्यांसाठी वापरला, माझ्या मंत्र्यांना मी काही विचारू शकत नाही का, असा सवाल संजय शिरसाट यांनी केला.
नेमकं वक्तव्य काय?
आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंवर टीका करताना धक्कादायक वक्तव्य केलं होतं. भाषणादरम्यान ते म्हणाले, ‘ सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत. भुमरे भाऊ माझेच भाऊ. काय काय लफडी केलीय तिलाच माहिती. तू कोण आहे कोण? आयुष्य आमचं गेलं त्या शिवसेनेत ३८ वर्ष घालवली. तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करता… अंबादासनं मला सांगितलं. राजकारणात कधी काही घडतं. अंबादासने मला फोन केला. ती बाई लई डोक्याच्या वर झाली… असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं होतं.
माझ्या फ्लॅटवर आक्षेप का?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनीही संजय शिरसाट यांच्यावर नवीन आरोप केला. मुंबईत ७२ व्या मजल्यावर घेतलेला फ्लॅट कुणाचा आहे, असा सवाल त्यांनी केलाय. त्यावर संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलंय. ३८ वर्षानंतर मुंबईत मी राहण्यासाठी फ्लॅट घेतला. त्याच्यावर तुम्हाला आक्षेप असेल तर त्याचं लोन भरा आणि तुम्ही जाऊन रहा. आणखी आक्षेप असेल तर चौकशी करा, असा इशारा त्यांनी दिलाय.
मातोश्रीवरून आंदोलनासाठी दबाव
माझ्याविरोधात आंदोलन करण्यासाठी मातोश्रीवरून दबाव येत असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय. त्यामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला माझ्याविरोधात आंदोलन करत आहेत, असं शिरसाट म्हणाले.
माझे कपडे काढाल तर..
संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरचे आमदार आहेत. महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा येत्या २ एप्रिल रोजी संभाजीनगरात होत आहे. या सभेत पहिलं टार्गेट संजय शिरसाट हेच असतील, असं स्पष्ट दिसंतय. मात्र या सभेच्या निमित्ताने संजय शिरसाट यांनी ठाकरेंना इशारा दिलाय. माझे कपडे काढायला लावले तर मी तुम्हाला सगळे कपडे काढून फिरायला लावीन. मी इथपर्यंत संघर्ष करून आलोय. अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेत. तुमच्या सगळ्या आरोपांना मी तत्काळ मुख्यमंत्र्यांच्या ८ तारखेच्या सभेत उत्तर देईन, असा इशारा शिरसाट यांनी दिलाय.