संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख भावुक, मस्साजोगच्या ग्रामस्थांना काय केली विनंती?
मंगळवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या मस्साजोग गावाला भेट देणार आहेत. त्यापूर्वी आज गावात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली, या घटनेनंतर आता राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय आरोप- प्रत्यारोप देखील सुरू आहेत. मंगळवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या मस्साजोग गावाला भेट देणार आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी आज ग्रामस्थांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.
बैठकीत नेमकी कशावर चर्चा?
आपण आंदोलन केलं की पोलीस प्रशासन आरोपींना अटक करत आहे. पीआय महाजन यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, दोन दिवसांपूर्वी ते आपल्याच प्रकरणात ड्राफ्टिंग करताना दिसले. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा. दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा. विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करा, या प्रकरणात पोलिसांनी घेतलेली भूमिका संशयास्पद आहे, अशा मागण्या येथील ग्रामस्थांकडून करण्यात आल्या आहेत.
दरम्यान यावेळी बोलताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटलं की, तपास यंत्रणेवर डाऊट घेऊन जमत नाही, त्यांचं काम चांगलं सुरू आहे. 6 डिसेंबरपासून 11 डिसेंबरपर्यंत तपास करून CID कडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपींनी पोलिसांना 50 पेक्षा जास्त कॉल केले आहेत. तपास यंत्रणेवर अविश्वास दाखवून जमनार नाही, कारण त्यांच्याकडून आपल्याला काम करून घ्यायचं आहे.
एकमेकांविषयी गैरसमज करून घेऊ नका, सर्वांचा उद्देश एकच आहे. जशा काही गोष्टी पोलीस स्टेशनच्या गोपनीय असतात तशा आपल्या सुद्धा गोपनीय असतात. सुप्रिया सुळे यांना सगळे पॉईंट नोट करून देऊ. मला पोरकं करू नका, कुठलेही आंदोलन करताना चुकीचं पाऊल पडता कामा नये, आपण याच पद्धतीने पुढे गेलो तर आरोपींना फाशी दिल्याशिवाय थांबणार नाहीत. या आरोपींचा आणि टोळीचा जोपर्यंत नायनाट होत नाही तोपर्यंत लढत राहू, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, मात्र या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरारच आहे.