गौतमी पाटीलचा पुन्हा साताऱ्यात जलवा, लावणीचं निमित्त ऐकून तुम्ही म्हणाल नादच खुळा…
संपूर्ण महाराष्ट्राला गौतमी पाटील हिने तिच्या डान्सने वेड लावलं आहे. तिच्या अनेक कार्यक्रमात तरुणाईचा गोंधळ झालेला पाहायला मिळत असून गौतमी पाटील संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाली आहे.
सातारा : महाराष्ट्रातील कोणत्याही तरुणाला गौतमी पाटील ( Gautami Patil ) नाव माहिती नसेल असा तरुण शोधून सापडणार नाही. संपूर्ण तरुणाईला परिचित असलेल्या गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे. गौतमी पाटील हीचे जवळपास महिनाभर बुकिंग वेटिंगवर आहे. त्यामुळे गौतमी पाटील हिची क्रेझ संपूर्ण महाराष्ट्रात असून सर्वांनाच गौतमी पाटील हिने वेड लावलं आहे. आज पुन्हा गौतमी पाटील ही साताऱ्यात थिराकणार ( Satara Gatami Patil Dance ) आहे. पंधरा दिवसांपूर्वी पाच वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाला खोजेवाडी येथे गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम पार पडला होता. आता पुन्हा एकदा वाढदिवसाला गौतमी पाटील साताऱ्यात हजेरी लावणार आहे. पण तो वाढदिवस खास असल्याने त्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
आपल्याकडे मराठीत म्हणतात हौसेला मोल नसतं, अगदी तसंच काहीसे आज साताऱ्यात घडतंय. एका बैलगाडा मालकाने आपल्या बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटील हिचा लावणीचा कार्यक्रम ठेवून आपली हौस पूर्ण करणार आहे.
लाडक्या बैलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौतमी पाटील ही पुन्हा साताऱ्यात थिरकणार आहे. त्यामुळे सातारकरांना पुन्हा एकदा गौतमी पाटीलचा जलवा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी तोबा गर्दी होण्याची शक्यता आहे.
बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटील सायंकाळी सात वाजता उपस्थित राहणार आहे. जावलीतील खर्शी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बैलगाडा मालक आणि पैलवान म्हणून प्रसिद्ध असलेल्या सतीश भोसले यांनी हे आयोजन केले आहे.
View this post on Instagram
त्यांचा आश्विन नावाचा बैल हा महाराष्ट्र चॅम्पियन असून त्याच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने हे आयोजन करण्यात आले आहे. गौतमी पाटीलचा मुजरा पाहण्यासाठी तरुणाईची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खर्शीकडे हळूहळू तरुणाईचे पाऊले वळू लागले आहे.
गौतमी पाटील ही तिच्या डान्समुळे अनेकदा वादात सापडली आहे. त्यावरून तिने अनेकदा माफीही मागितली आहे. मात्र गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांवर त्याचा कुठलाही परिणाम झालेला नाही. उलट तिच्या कार्यक्रमांना मागणी वाढत गेली. आणि गौतमी पाटील अधिकच प्रसिद्ध होत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला होता. तर त्यावर गौतमी पाटील हिने माझ्यावर लोकांचे प्रेम आहे म्हणून तो गोंधळ झाला होता असे म्हंटले होते. याशिवाय गौतमी पाटील हिचा कपडे बदलत असतांनाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावरही व्हायरल झाला होता. त्यावरूनही गौतमी पाटील जोरदार चर्चेत आली होती.