Satara : साताऱ्यात अंनिसने उतरवलं अंधश्रद्धेचं भूत, जनजागृती करीत महिलेच्या डोक्यावरील जटा कापल्या!
अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे सुरेंद्र शिंदे यांनी आणि शारदाताई यांच्या बहिण उषा वायदंडे यांनी शारदाताई यांची समजूत काढली. शारदाताई या जटा काढण्यासाठी तयार झाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती डॉ हमीद दाभोलकर यांना दिली.
सातारा : समाजात आजही अनेकांच्या मुंडक्यावर बसलेलं अंधश्रध्देचं भूत उतरता उतरत नाही. समाजातील अंधश्रध्देचं हे भूत उतरवण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समिती(ANIS) काम करताना पहायला मिळते. याचेच एक उदाहरण आज साताऱ्यातील मल्हारपेठेत पहायला मिळाले. मल्हार पेठेत राहणाऱ्या शारदाताई बाबर(Sharadabai Babar) यांच्या डोक्यावर गेली चार वर्षा पासून जटा वाढत चालल्या होत्या. या जटा वाढण्यामागचे कारण म्हणजे शारदाताई बाबर यांना देवाच्या जटा असल्याचे अनेकांनी डोक्यात बिंबवले आणि त्यांनी त्या तशाच वाढवल्या. मात्र शारदाताईंच्या वाढत गेलेल्या केसांच्या गुंत्यामुळे त्यांच्या डोक्यावर सुमारे साडेतीन किलोपेक्षाही जास्त वजनाच्या ह्या जटा झाल्या होत्या. या वाढत चाललेल्या केसांच्या गुंत्यामुळे त्यांच्या डोक्यावर मोठं ओझं असल्याचे त्यांना अनेक वेळा जाणवत होते. शिवाय त्यांच्या मानेलाही त्रास होत होता. त्यांना झोपताना रात्रभर एकाच अंगावर झोपावे लागत असे आणि त्यामुळे त्यांचा खांद्यालाही वेदना होत होत्या. दरम्यान अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे सुरेंद्र शिंदे यांनी आणि शारदाताई यांच्या बहिण उषा वायदंडे यांनी शारदाताई यांची समजूत काढली. शारदाताई या जटा काढण्यासाठी तयार झाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती डॉ हमीद दाभोलकर यांना दिली. (In Satara, Annis cut the hair on a woman’s head while raising awareness)
अंनिसच्या उपस्थितीत शारदाताईंचे केस काढण्यात आले
काही वेळातच अंनिसची टिम मल्हार पेठेत पोहचली. शारदाताई यांच्या सांगण्यानुसार मला डोक्यावरचे सर्वच केस काढायचे आहेत असा अट्टाहास धरल्यानंतर त्यांना जवळच्याच केशकर्तनालयात नेण्यात आले आणि त्यांच्या डोक्यावरचे सर्वच केस काढण्यात आले. त्यांच्या डोक्यावरचे केस काढल्यानंतर मात्र त्यांनी खळखळून हसत आपल्याला मनापासून आनंद होत असल्याचे सांगताना हात जोडून अंनिसचे आभारही मानले. यावेळी अंनिसच्या वंदना माने आणि डॉ. दिपक माने, सुरेश शिंदे, संतोष साळुंखे हे उपस्थित होते.
केसांची योग्य निगा न राखल्यामुळे जटा वाढतात
केस वेळचे वेळी न धुणे, न विंचरणे, त्याची निगा न राखणे या कारणातून ह्या जटा वाढत असतात. जेव्हा केसांचा गुंता तयार होतो तेव्हा त्या एकमेकाला चिटकून राहतात आणि लोक त्याला देवाची जटा असे सांगून त्याची देवपूजा करायला सुरवात करतात. समाजातील या अंधश्रध्देच्या पायात अनेक महिलांच्या डोक्यावर तीन किलोच्या वरती आणि सुमारे 10-12 किलोची जट तयार होते. आणि याचा त्रास त्या संबंधित महिलेला होत असतो. त्रास होत असताना त्या कोणाला सांगायलाही धजावत नाहीत कारण समाज काय म्हणेल या विचारात ती महिला हे डोक्यावरचं ओझं तसंच घेऊन आयुष्य जगत असते. त्यामुळे अशी जट असलेल्या महिलांनी अंधश्रध्दा निर्मुलन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ हमीद दाभोलकर आणि वंदना माने यांनी केले आहे. (In Satara, Annis cut the hair on a woman’s head while raising awareness)
इतर बातम्या
Latur Crime : लातूरमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याला धारदार हत्याराने भोसकले, हत्येचे कारण अस्पष्ट