साताऱ्याची ‘चक दे इंडिया’ | ऊसतोड मजुराची मुलगी खेळणार जर्मनीत हॉकी, तिच्या यशामागे हे 2 शिक्षक
काजलचा भावंडात पाचवा नंबर, ऊस तोडणीसाठी सहा महिने जावे लागत असल्याने काजलची शाळा बुडु लागली, तेव्हा शिक्षिकेनी जबाबदारी घेतली.
मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : सहा महिने ऊसतोडणी तर सहा महिने मातीकाम करुन कुटुंबाचं पोट कसंतरी भरायचं असे अस्थिर आयुष्य. पदरी पाच मुली आणि दोन मुलांना सांभाळायचं अवघड आव्हान, जिथे पोटभरण्याची भ्रांत तेथे मुलांना शिकवायचं कसं याचं टेन्शन अशा वातावरणात सातारा येथील दुष्काळी माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी या गावात राहणाऱ्या सदाशिव आटपाटीकर यांच्या लेकीची जर्मनीतील चार राष्ट्रांच्या हॉकीस्पर्धांसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
काजलचा भावंडात पाचवा नंबर, ऊस तोडणीसाठी सहा महिने जावे लागत असल्याने काजलची शाळा बुडु लागली, तेव्हा वर्ग शिक्षिका संगिता जाधव यांनी तिच्या रहाण्याची व्यवस्था करीत तिच्या आई-वडीलांना आश्वस्थ केले. काजल पोलीस भरतीच्या मुलांसोबत तोडीसतोड धावतेय आणि धावताना अजिबात दमत नाही हे पाहून तिचे क्रीडा शिक्षक चंद्रकांत जाधव यांनी तिच्यातील गुण हेरले आणि तिला पाठींबा दिला. त्यांनी तिला धावण्याच्या स्पर्धेत उतरविले. परंतू तिची उंची कमी असल्याने चंद्रकांत जाधव यांनी तिला हॉकी खेळण्याचा सल्ला दिला. या दोन गुरुंनी काजलमधील गुण हेरत मदत केल्याने तिचे अक्षरश: भाग्य उजळले.
लेकीनं देशाचं नाव करावं
काजल हीचे वडील सदाशिव आणि आई नकुसा दोघेही लेकीच्या कामगिरीने प्रचंड आनंदी आहेत. शेती कमी असल्याने परिस्थिती पाहून सर्व मुलांना जमेल तसं आम्ही थोडं थोडं शिकवले असल्याचे ते म्हणतात. परंतू काजलची जबाबदारी शिक्षकांनी घेतल्याने आणि तिला करीयर घडविण्यास मदत केल्याने त्यांचे खूप आभार असल्याचे सदाशिव सांगतात. मुलगी स्पर्धांत बक्षिसे मिळवितेय, खेळात पुरस्कार मिळवतेय हे पहायला शिक्षकांनी आम्हाला बोलविले होते. तिने आमचं नाव मोठं केलंय तिने आयुष्यात असेच अनेक बहुमान मिळवत देशाचं नाव मोठं करावे असे तिचे आई-वडीलांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले.