पूजेसाठी एकनाथ शिंदे दरे गावात? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस सातारा दौऱ्यावर होते. पण विरोधकांनी आधी शिंदे सुट्टीवर गेल्याची टीका केली आणि आता दरे गावात मुख्यमंत्री पूजेसाठी गेल्याचं ठाकरे गट म्हणतोय. विरोधकांच्या या टीकेला शिंदेंनी 65 फाईल्स क्लीअर करुन उत्तर दिलंय.

सातार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातल्या दरे गावात आपल्या घरी आले आणि विरोधकांनी वेगळीच चर्चा सुरु केली. शिंदेंकडून पूजा अर्चना सुरु असल्याचं विरोधकांनी म्हटलंय. विरोधकांचा सूर सत्तासंघर्षाच्या निकालाकडे आहे. सत्तासंघर्षाचा निकाल कधीही येऊ शकतो. त्याचपार्श्वभूमीवर शिंदेंकडून पूजा पाठ सुरु असल्याचं ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी म्हटलंय. तर दरे गावातल्या घरातून काही तरी धूर निघतोय, असं संजय राऊतांचं म्हणणंय.
दरे गावात पोहोचल्यावर, मुख्यमंत्री शिंदेंनी गावकऱ्यांशी चर्चा केली. स्थानिक अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आणि आपल्या शेतीची पाहणीही केली. त्यानंतर ग्रामदैवत जन्नी देवीची आरतीही मुख्यमंत्र्यांनी केलीय. दरे गावात सध्या यात्रा सुरु आहे, त्यानिमित्तानं सहकुटुंब मुख्यमंत्री शिंदेंनी जन्नी देवीची आरती केली. तर विरोधकांच्या टीकेला स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यालयानंही उत्तर दिलंय.
सातारा दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री सचिवालयातील 65 फाईल्सचा निपटारा केला. सचिवालयात विविध विभागांच्या फाईल्स येत आहेत. त्या प्रलंबित राहू नयेत म्हणून त्यांचा नियमित निपटारा करण्यात येतो. आपण सुट्टीवर नसून डबल ड्युटीवर असल्याचं सांगत शिंदेंनीही विरोधकांना उत्तर दिलंय.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उलट सुलट चर्चा सुरु आहेत. शिंदेसह 16 आमदार अपात्र होणार आणि सरकार कोसळणार, असा दावा वारंवार ठाकरे गटाकडून होतोय. मुख्यमंत्री शिंदे याआधीही दिवाळीत, आपल्या दरेगावी आले होते. त्यावेळी शिंदे शेतात रंगले होते. पण यावेळी ते आपल्या गावी आले असले तरी, सरकारी कामंही सुरुच आहेत. मात्र विरोधकांना खास पूजा पाठ हे मुख्य कारण वाटतंय.