दिशा सालियनच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध? वकिलांचा पहिल्यांदाच मोठा खुलासा
दिशा सालियन प्रकरणात हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. यावर आता सतीश सालियन यांच्या वकिलाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

दिशा सालियन प्रकरणात हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान दिशा सालियन प्रकरणात मोठं ट्विस्ट निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिशाच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते, ती त्यांना पैसे द्यायची त्यामुळे दिशाला नौराश्य आलं होतं असा दावा करण्यात येत आहे. यावर आता सतिश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले निलेश ओझा?
‘दिशाच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते, ती त्यांना पैसे द्यायची, त्यातून ती निराश होती. हे सारं मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये लिहिल्याचा दावा केला जात आहे. मात्र जर तो रिपोर्ट मुंबई पोलिसांनी मागे घेतला आहे, तर मग तो वैध कसा? त्यातील गोष्टींना काही अर्थच उरत नाही, त्यानंतर एसआयटीची स्थापना झाली आणि नव्यानं तपास सुरू झाला आहे. त्यामुळे या रिपोर्टचा काहीही फायदा होणार नाही, मालवणी पोलिसांनी किती खोटे पुरावे तयार केलेत यासाठी त्यांना नोबल पुरस्कार मिळायला हवा,’ असं सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी म्हटलं आहे.
अनिल देशमुखांचा आरोप
दरम्यान या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील मोठा दावा केला आहे. दिशा सालियन प्रकरणात क्लोजर रिपोर्ट आला आहे. आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र सुरू आहे. मी गृहमंत्री असल्यापासून सांगत आहे, की हे एक षडयंत्र आहे, आणि हेच सत्य आहे, असं या प्रकरणावर बोलताना अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. या प्रकरणावरून आरोप -प्रत्यारोपाला उधाण आलं आहे, या प्रकरणात बोलताना भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या आरोपांना आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.