Nashik|‘महाप्रित’मधून अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांना उद्योग, स्वयंरोजगार मिळावा; सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंडे यांचे आवाहन
मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन भाजीपाला, फळे आदी प्रक्रिया व विक्री साठी 100 महिला बचत गटांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.
नाशिकः महामंडळाच्या व महाप्रीत कंपनीच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना ग्रामीण भागात उद्योग, स्वयंरोजगार मिळावा, अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे, तसेच यासाठी केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ गरजू घटकांना मिळावा यासाठी सबंधित सर्व अधिकाऱ्यांनी या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहायक मंत्री धंनजय मुंडे यांनी केले आहे.
राज्यस्तरीय कार्यशाळा
नाशिक येथील हॉटेल एक्सप्रेस इन येथे आयोजित महात्मा फुले नविकरणीय ऊर्जा प्राद्योगिकी मर्या (महाप्रित) मुंबई आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहायक मंत्री धंनजय मुंडे यांनी केले. मुंडे बोलत होते. या प्रसंगी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी , विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महाप्रितचे संचालक विजयकुमार काळम-पाटील, मुख्य व्यवस्थापक गणेश चौधरी, महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम, महाप्रित टास्क फोर्सचे सदस्य केशव कांबळे आणि प्रादेशिक व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापक व राज्यस्तरीय अधिकारी उपस्थित होते.
100 महिला बचत गटांना अनुदान
यावेळी मुंडे म्हणाले की, महामंडळाच्या जुन्या योजनांसोबतच आता विविध कृषी प्रक्रिया उद्योग राबविण्यासंदर्भात नाविन्यपूर्ण योजना राबविली जात आहे. महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन भाजीपाला, फळे आदी प्रक्रिया व विक्री साठी 100 महिला बचत गटांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल. बायोगॅस, फ्लाय अॅश पासून विस्तारित होणारे प्रकल्प यांनाही आर्थिक प्रोत्साहन मिळाल्यास या क्षेत्रातही रोजगारासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आज सर्व जगाला सौर ऊर्जेचे महत्व कळले आहे. मर्यादित ऊर्जा स्रोतांच्या काळात सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन दिल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार तर मिळतीलच शिवाय शासनाला देखील ऊर्जा नियमनासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे, असेही मुंडे म्हणाले.
महामंडळाचे कौतुक
भविष्यात मागासवर्ग विकास महामंडळ नाही तर आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे महामंडळ म्हणून ओळख निर्माण व्हावी, यासाठी आपण सर्वांनी मिळून व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येक योजनेच्या यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी साठी आपण सर्वच जण प्रामाणिक प्रयत्न कराल, अशी अपेक्षा त्यांनी केली. तसेच विशेष कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व महाप्रीत कंपनीचे मुंडे यांनी अभिनंदन केले.
काय आहे ‘महाप्रित’?
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.अंतर्गत एप्रिल-2021 मध्ये ‘महाप्रित’ कपंनी स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीमार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या लाभार्थींना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी विविध योजना प्रस्तावित आहेत. त्यानंषगाने महात्मा फुले नविकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) मार्फत मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी हवामान बदलाचा विचार करुन कृषी प्रक्रिया उद्योग, सौर प्रकल्प, मुलभूत सुविधा असे पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी दिली.
264 महिला बचत गटांना स्वयंरोजगार
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने सर्व योजनांचे उद्दीष्टे पूर्ण करण्याबरोबरच जास्तीत जास्त योजना समाजातील तळागाळापर्यंत पोहचतील यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरुन मागासवर्गीय समाजाला योजनांची माहिती होवून त्याचा लाभ घेण्यासाठी पुढे येतील व त्यांची आर्थिक उन्नती होईल. कार्यशाळेत यावेळी महामंडळाचे मुख्य व्यवस्थापक शैलेश चौधरी, महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम यांनी मार्गदर्शन केले. कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याशी समन्वय साधून महाराष्ट्रात कृषी प्रक्रिया उद्योग, समान सुविधा केंद्रासाठी सुमारे 264 महिला बचत गटांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
इतर बातम्याः
Nashik| ओमिक्रॉनच्या रुग्णामुळे प्रशासन दक्ष; नाशिक जिल्ह्यात 353 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू