छत्रपती शाहू महाराज यांनी खोडला रामदास कदम, नारायण राणे यांचा तो दावा, काय म्हणाले पाहा…
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी या उपोषण स्थळी भेट घेतली. छत्रपती शाहू महाराज यांनी मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, मनोज जरांगे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात यावेळी महत्वाची चर्चा झाली.
जालना | 31 ऑक्टोंबर 2023 : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी या उपोषण स्थळी भेट घेतली. मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. सगळे जरांगे यांच्यासोबत आहेत. सगळे पाटील साहेब यांच्यामागे आहोत. मराठा समाजाचे हे आंदोलन टिकले पाहिजे. शासनाकडून आरक्षण मिळायला हवे. म्हणून या जबरदस्त आंदोलनामागे, जरांगे यांच्या पाठीशी सर्व संघटनांनी उभे रहा असे आवाहन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले. सर्वांनी एकंमेकाना आणि पाटील साहेबांना सहकार्य करायला हवं असेही ते म्हणाले.
जाळपोळ कोण करतंय जे माहित नाही. मात्र, आपल्यावर अन्याय होणार नाही आणि कोणता ठपका लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. समाजातील कोणत्याही तरुणाने आत्महत्या करू नका. त्याने काही होणार नाही. जर जीव राहिले तर तेच लोक जोमाने काम करतील. उलट सोबत रहा. आत्महत्या करू नका. शांततेने आंदोलन करा. आपले ध्येय ठेवून आंदोलन करू असे ते म्हणाले.
खऱ्या अर्थाने आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी हे आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाला आवाहन करतोय की त्यांनी सातत्याने जरांगे पाटील यांच्या पाठी ठाम उभे राहायला हवे. समाजात एकता असते. त्यामध्ये ताकद असते. सर्वांनी एकत्रितपणे काम करून तो उद्देश साध्य केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या मीटिंगनंतर काय होत ते समजेलच. इतर ठिकाणी आणि जिल्ह्यात जरांगे यांना निश्चित पाठिंबा दिसत आहे. पाटील साहेब यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. स्वतः आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही काळजी घ्यावी. मनोज जरांगे चांगले काम करत आहे आणि करत राहतील. दीर्घ आयुष्य लाभो. तब्येतीची काळजी घेण्यासाठी त्यांनी काय करावे हे सांगितले आहे. आपल्यासाठी ते चांगले काम करणार आहेत असे त्यांनी सांगितले.
या चर्चेदरम्यान जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळावे ही आपली प्रमुख मागणी असल्याचे सांगितले. तर, काही नेत्यांचा याला विरोध असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे रामदास कदम आणि नारायण राणे यांच्यावर टीका केली. त्यावेळी छत्रपती शाहू महाराज यांनी ते चुकीचे सांगत आहेत. कुणबी आणि मराठे हे एकच असल्याचा पुनरुच्चार शाहू महाराज यांनी यावेळी केला.
दरम्यान, छत्रपती शाहू महाराज यांनी जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी भेट घेतली. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी जरांगे पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांची विचारपुस केली. जरांगे पाटील यांच्या घरी त्यांचे वडील, पत्नी आणि दोन मुली होत्या.