मनामध्ये असते तेच शरद पवार करतात, दाखवताना मात्र सामूहिक निर्णय दाखवतात…अजित पवार यांचा हल्लाबोल
शरद पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य केली जातात. त्यांना पाहिजे तेच ते करतात. तो त्यांचा स्वभाव आहे. तो बदलणे शक्य नाही. आम्हाला मध्येच ते म्हणतात मी निवृत्त होतो. परंतु त्यांच्या मनामध्ये वेगळेच असते. जे मनामध्ये असते तेच ते करतात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीने महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार यांनी देशातील प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अशी भविष्यवाणी केली आहे. आमची आणि काँग्रेसची विचारसरणी सारखी असल्याचे त्यांनी म्हटले होते. आपण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते घेऊन राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत निर्णय घेऊ, असे शरद पवार म्हणाले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार मनामध्ये असते तेच करतात, परंतु दाखवताना तो सामूहिक निर्णय असल्याचे दाखवत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
शरद पवार संभ्रम निर्माण करतात
शरद पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य केली जातात. त्यांना पाहिजे तेच ते करतात. तो त्यांचा स्वभाव आहे. तो बदलणे शक्य नाही. आम्हाला मध्येच ते म्हणतात मी निवृत्त होतो. परंतु त्यांच्या मनामध्ये वेगळेच असते. जे मनामध्ये असते तेच ते करतात. परंतु दाखवताना हा निर्णय सामूहिक असल्याचे दाखवतात. भाजप बरोबर जाण्याची चर्चा झाल्याचे शरद पवार आता किमान मान्य करत आहेत. यासाठी सहा बैठका झाल्या होत्या. जर भाजप सोबत जायचे नव्हते तर का झाल्या होत्या या बैठका? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे काँग्रेसममध्ये जाणार नाही
ठाकरे काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करतील असे वाटत नाही. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांना पाहिले आहे. एकंदरीत ते असा काही निर्णय घेण्याची शक्यता नाहीच. शरद पवारांचा पराभव करणे हेच आमचे उदीष्ट आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी केलेले विधान चुकीचे आहे. त्यांची चूक झाली हे मी मान्य करतो. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले तुम्ही बारामतीत येऊ नका. आम्ही पाहतो. त्यानंतर त्यांच्याकडून असे वक्तव्य झाले नाही.
शरद पवार पक्ष सोडून घेणाऱ्यांना परत घेणार नाही, असे म्हणाले आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले, निलेश लंके यांना घेतले ना. राजकारणात असे काहीच नसते. लोकांमध्ये संभ्रमअवस्था निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कोणी कायमचा मित्र नसतो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
साताऱ्याची जागा आम्ही सोडली आहे, त्या बदल्यात आम्हाला राजसभेची जागा मिळणार आहे. म्हणून आम्ही आमची हक्काची जागा सोडली असल्याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.