Ramdas Athawale On Pawar : शरद पवार अजिबात जातीयवादी नाहीत, फडणवीसांच्या ट्विटर बाँबनंतरही आठवले मतावर ठाम
Ramdas Athawale On Pawar : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जातीयवादी असल्याची टीका केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला.
मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जातीयवादी असल्याची टीका केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(sharad pawar) यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला. फडणवीस यांनी ट्विटवर ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर टीका केली. मात्र, फडणवीसांच्या या ट्विट बॉम्बनंतरही रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) आपल्या मतावर ठाम आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे जातीयवादी नाहीत. कुणीही जातीवादी होऊ नये. जातीयवादाचं राजकारण करू नये. मी शरद पवारांसोबत होतो. मी त्यांना अत्यंत जवळून काम करताना पाहिलं आहे. ते जातीयवादी नाहीत, असं रामदास आठवले म्हणाले. मीडियाशी संवाद साधताना आठवले यांनी हा पुनरुच्चार केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत शरद पवारांवर थेट आरोप केला होता. पवार देव मानत नाहीत. ते नास्तिक आहेत. ते कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत, अशी टीका करतानाच पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यापासून राज्यात जातीचं राजकारण सुरू झाल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला होता. राज यांच्या विधानानंतर राजकीय धुरळा सुरू झालेला असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी एकामागोमाग 14 ट्विट केले होते. या ट्विटमधून फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी कशी जातीयवादी आहे आणि त्यांच्या सत्ताकाळात राज्यातील कायदा सुव्यवस्था कशी ढासळली होती, हे दाखवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र, रामदास आठवले यांनी पवार जातीयवादी नसल्याचं सांगून मित्र पक्षाचीच कोंडी केली आहे.
आठवले आधी काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला जातीयवादी पक्ष म्हटले आहे, त्याचा अर्थ शरद पवार जातीयवाद करतात असा नाही, पण त्यांच्या खालचे नेते मात्र जातीयवाद करतात हे भीमा कोरेगाव इथं झालेल्या दंगलीच्या वेळी स्पष्ट झाले आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं होतं. राज ठाकरे यांना बरोबर घेण्याची भाजपला आवश्यकता नाही, त्याला आमचा विरोध आहे, राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते पण त्यांना मत मिळत नाहीत, त्यांना बरोबर घेतल्यास भाजपला तोटा होईल, त्यांची भूमिका देशपातळीवर भाजपला सोयीची नाही. त्यामुळे त्यांना बरोबर घेण्याची गरज नाही. त्याला आमचा विरोध आहे, असंही ते म्हणाले.
हिंदूंनी मंदिरात भोंगा लावण्याला विरोध नाही. पण जाणीवपूर्वक मशिदीपुढे भोंगे लावून तणाव निर्माण करू नये, मशिदी वरून भोंगे काढण्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेला मात्र विरोध असल्याच आठवले यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकार देश हिंदुत्ववाद करण्याचा प्रयत्न करतायेत, या आरोपात तथ्य नाही, मोदी यांनी मुस्लिम, ख्रिश्चन समाजाला ही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा अजेंडा विकासाचा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : सत्ता येत नाही म्हणून भाजप निराशेने ग्रासले – राऊत