उद्धव ठाकरे यांना पुन्हा मोठा धक्का, बड्या नेत्यावरील नाराजीमुळे अनेक पदाधिकारी पक्ष सोडणार
shiv sena uddhav balasaheb thackeray: आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. त्यापूर्वी जिल्हा पातळीवरील नेते पक्ष सोडत असल्यामुळे शिवसेनेला उबाठासमोर मोठे आव्हान असणार आहे.

shiv sena uddhav balasaheb thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर एकामागे एक धक्के बसत आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या शिवसेनेला यश आले नाही. त्यानंतर राज्यभरातील अनेक पदाधिकारी त्यांची साथ सोडू लागले आहे. आता अहिल्यानगर शहरातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उबाठाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी पक्ष सोडणार आहे. या सर्वांची नाराजी पक्षातील बडे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर आहे.
संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अहिल्यानगर पक्षातील 12 माजी नगरसेवकांसह पदाधिकारी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे. खासदार संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन सर्व शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अहिल्यानगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून 20 ते 30 गाड्या घेऊन शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहे.
अंबादास दानवे यांचे प्रयत्न निष्फळ
खासदार संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन सर्व शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या सर्वांनी आठ दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेत प्रवेश करण्याची तारीख ठरली. नाराज पदाधिकारी पक्ष सोडणार असल्याची बातमी समजल्यानंतर अंबादास दानवे यांनी त्यांचा मन धरणीचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी केलेला प्रयत्न निष्फळ ठरले. यामुळे उद्धव ठाकरे यांना अहिल्यानगरमधून धक्का बसणार आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. त्यापूर्वी जिल्हा पातळीवरील नेते पक्ष सोडत असल्यामुळे शिवसेनेला उबाठासमोर मोठे आव्हान असणार आहे.




स्थानिक पातळीवर नेते आणि पदाधिकारी पक्षातून बाहेर पडत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना पक्षाची नव्याने बांधणी करावी लागणार आहे. तसेच पक्षातील गळती रोखण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांना पेलावे लागणार आहे.