तुमच्या बापाचंही नाव बदला..; औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावरून AIMIM चा शिवसेनेवर पलटवार
ज्याठिकाणी औरंगजेबची कबर आहे, त्याचं नाव खुलताबादवरून बदलून रत्नपूर ठेवावं, अशी मागणी शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केली. त्यावर आता AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगजेबच्या कबरीवरून अद्याप वाद सुरूच आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी औरंगजेबच्या कबरीच्या ठिकाणाचं नाव (खुलताबाद) बदलण्याची मागणी केली. त्यावर आता AIMIM ने प्रत्युत्तर दिलं आहे. AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांनी म्हटलंय, “आता उरलंय तरी काय? आपल्या बापाचंही नाव बदलून घेतलं पाहिजे.” ज्याठिकाणी औरंगजेबची कबर आहे, त्याचं खुलताबाद हे नाव बदलून रत्नपूर करण्याची मागणी शिरसाट यांनी केली होती. त्यावर इम्तियाज जलील यांनी ही प्रतिक्रिया दिली.
संजय शिरसाट याविषयी म्हणाले, “औरंगजेबाने आपल्या ठिकाणांची नावं बदलली होती. औरंगजेबाची कबर खुलताबाद याठिकाणी आहे. परंतु इंग्रजांच्या काळात ते रत्नपूर म्हणून ओळखलं जात होतं. काही लोकांना औरंगजेबावर प्रेम उसळून येतंय. परंतु आपल्याला आपली संस्कृती वाचवावी लागले. आम्ही औरंगजेबाची प्रॉपर्टी हिसकावून घेत नाही आहोत. आम्ही आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे दौलताबादचंही खरं नाव देवगिरी असं आहे. तिथे राजा राम देव राय यांनी राज्य केलं होतं. हा त्यांचा वारसा आहे. ते नावसुद्धा बदलायला हवं. आम्ही कोणती नवी मागणी करत नाही आहोत. औरंगजेबाने काबिज केल्यानंतर या ठिकाणांची नावं बदलली होती. आता तेच आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर याबाबतचा प्रस्ताव देणार आहोत. विधानसभेतही आम्ही हा प्रस्ताव आणू.”
शिरसाट यांच्या या मागणीवर AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “तुम्ही शहरांची, इमारतींची, रस्त्यांची नावं बदलत आहात. आता जर नावं बदलण्याची मालिका सुरूच झाली आहे तर तुम्ही तुमच्या बापाचंही नाव बदलून घ्या. आता अजून राहिलंय तरी काय? सांगून टाका की आम्हाला हे नाव आवडलं नव्हतं, आता हे नाव बदलणार. इथल्या शहरांची नावं बदलत आहात, परंतु गुजराच्या अहमदाबादमध्ये तुमचा बाप बसलाय का?”




“हिंमत असेल तर गुजरात आणि अहमदाबादची नाव का बदलत नाही? सांगा मोदी आणि शाह यांना. बोला की गुजरातमध्ये अहमद भाई चांगलं वाटतं का? इथे तुम्हाला अहमदनगर पसंत येत नाही. ज्या लोकांचे विचार खालच्या पातळीचे असतात, ते अशाच प्रकारे खालच्या दर्जाचं राजकारण करतात. शिकलेली व्यक्ती शहराच्या विकासाबद्दल बोलणार. परंतु काही लोकांचे विचार असेच असतात आणि ते अशाच पद्धतीची वक्तव्ये करतात. जग कुठे चाललंय आणि ही लोकं अजून तिथेच आहेत”, अशा शब्दांत त्यांनी सुनावलं.