उद्धव ठाकरे देव माणूस, घातकी माणसासोबत… शिंदेंनी तिकीट नाकारताच श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले, पत्नीलाही अश्रू अनावर
शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांना पालघरमधील उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे वनगा दाम्पत्याला अश्रू अनावर झाले. सुमन वनगा यांनी आपले पती आत्महत्या करण्याचा विचार करीत असल्याचे म्हटले आहे. वनगा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली आहे. "घातकी माणसासोबत गेलो आणि घात झाला", असं श्रीनिवास वनगा म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरमध्ये राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना मोठा धक्का बसला आहे. श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यासमोर त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. श्रीनिवास वनगा यावेळी कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले आहेत. तसेच त्यांच्या पत्नी सुमन वनगा यांना देखील पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना अश्रू अनावर झाले. “माझे पती आत्महत्या करण्याचा विचार करत आहेत”, असं सुमन वनगा यांनी म्हटलं आहे. तर “घातकी माणसासोबत गेलो आणि माझा घात झाला”, अशी प्रतिक्रिया श्रीनिवास वनगा यांनी दिली आहे. तसेच “ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देवमाणूस होते”, असंदेखील श्रीनिवास वनगा म्हणाले आहेत.
सुमन वनगा काय म्हणाल्या?
श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. “श्रीनिवास वनगा कालपासून जेवत नाहीयत. काही बोलतही नाहीयत. वेड्यासारखे वागत आहेत. आत्महत्या करणार असं म्हणतात. माझं आयुष्य संपून गेलं. उद्धव साहेब माझ्यासाठी देवमाणूस होते. ते उद्धव ठाकरे यांचं सारखं नाव घेत आहेत आणि सांगतात की, माझी चूक झाली की मी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी शब्द दिला होता. त्यांनी 39 आमदारांचं पुनर्वसन केलं. मग माझ्या मिस्टरांचं काय चुकलं? त्यांचं काय बरं-वाईट झालं तर मी कुणला जबाबदार धरु?”, असं सुमन वनगा रडत-रडत म्हणाल्या.
श्रीनिवास वनगा काय म्हणाले?
“मी देवमाणसाला सोडून आलो. उद्धव ठाकरे माझ्यासाठी देवमाणूस होतो. त्यांच्यामुळे मी पालघर विधानसभा मतदारसंघाचा आमदार झालो. पण घातकी माणसासोबत गेलो आणी माझा घात झाला. त्यावेळेस बंड करताना मला शब्द दिला होता की, कोणत्याही आमदाराचं तिकीट कापणार नाही आणि आमची आज ही अवस्था आहे”, असं श्रीनिवास वनगा रडत-रडत म्हणाले.
“मी प्रामाणिक आहे, एकनिष्ठ आहे त्याचं हे फळ मला मिळालं आहे. माझी फसवणूक झाली आहे. प्रत्येकवेळेस राजेंद्र गावितला आयात करायचा, तो दहा पक्ष बदलतो, त्याला संधी दिली जाते. पण माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला का डावललं जातं? मी मतदारसंघात चांगलं काम केलं. एकनिष्ठ राहिलो. सगळं केले. तरीपण मला डावललं गेलं”, अशी खंत वनगा यांनी व्यक्त केली.