‘चोर म्हटल्यावर आशिष शेलारांना राग का येतो?’ सुषमा अंधारे यांचा भर सभेत सवाल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी खेडमधील आजच्या सभेत जोरदार भाषण केलं. या भाषणाच्या वेळी त्यांनी भाजप (BJP) आणि शिवसेनेवर (Shiv Sena) सडकून टीक केली
रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी खेडमधील आजच्या सभेत जोरदार भाषण केलं. या भाषणाच्या वेळी त्यांनी भाजप (BJP) आणि शिवसेनेवर (Shiv Sena) सडकून टीक केली. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर टीका करताना चोर असा शब्दप्रयोग केलेला. पण त्यांच्या टीकेवरुन विधानसभेत त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला. याच मुद्द्याचा धागा पकडत सुषमा अंधारे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला. “संजय राऊत म्हणाले तिथे काही चोर बसले आहेत. तिथे काही चोर बसले आहेत असं ते म्हणतात तेव्हा त्या सभागृहात काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार आहेत. यापैकी कुणालाही आमदारांना राग येत नाही. तर राग आशिष शेलारांना येतो”, असं सुषमा अंधारे म्हणाले.
“आशिष शेलारांना राग येतो. अब हम इतनाही बोल रहे है की अरे भाई चोर के दाढी में तिनका है, तो जो चोर होगा वो अपनी दाढी टटोलेगा. आशिष शेलार अपनी दाढी क्यूँ टटोल रहे हैं. चोर म्हटल्यावर आशिष शेलारांना राग का येतो? हा खरा चर्चेचा विषय असला पाहिजे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
सुषमा अंधारे आणखी काय म्हणाल्या?
“विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की जे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की, आम्हाला चोर म्हटलेलं आवडलेलं नाही, त्याच आशिष शेलारांना आणि देवेंद्र फडणवीसांना एका दुसऱ्या गोष्टीचा विसर पडतोय की, त्यांच्याच पक्षाचे आमदार असणारे मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील ही सगळीच्या सगळी मंडळी जी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बरळत होती, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बेताल वक्तव्य करत होती, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंबद्दल वक्तव्य करत होती”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
“त्या सगळ्यांवर हक्कभंग तर सोडा, महापुरुषांचं अवमान होतंय म्हणून तरी किमान निंदाव्यंजक ठराव मांडणं आवश्यक होतं. पण त्यांनी तसा ठराव मांडला नाही. याचाच अर्थ देवेंद्र फडणवीस दुटप्पी भूमिका घेतात. देवेंद्र फडणवीस आपल्या आमदारांना वाचवतात. पण जाणीवपूर्वक हक्कभंगाचा प्रस्ताव आणतात”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.