प्राजक्ता माळी प्रकरणात शिवसेनेनं पहिल्यांदाच भूमिका केली स्पष्ट, सुरेश धस यांना सल्ला काय?
सुरेश धस यांनी आपली माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळी यांनी केली होती, त्यावर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
शनिवारी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेतली होती, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आमदार सुरेश धस यांना चांगलंच सुनावलं, तसेच त्यांनी आपली माफी मागावी अशी मागणी देखील केली. दरम्यान प्राजक्ता माळी यांच्या या पत्रकार परिषदेनंतर आता अनेक राजकीय नेते देखील आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत आहेत. भाजपनंतर शिवसेनेकडून देखील ट्विट करत धस यांचे कान टोचण्यात आले आहेत. शिवसेना नेते नरेश मस्के यांनी हे ट्विट केलं आहे.
#बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर, बीड शहरात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह हजारो नागरिकांनी ‘ मूक मोर्चा’ काढला. हे #आंदोलन निश्चितच योग्य आहे, न्याय मिळवण्यासाठी आणि हत्येच्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी करणे आवश्यक… pic.twitter.com/qOKd2icVxP
— Naresh Mhaske (@nareshmhaske) December 29, 2024
नेमकं काय म्हणाले नरेश मस्के?
‘बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर, बीड शहरात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह हजारो नागरिकांनी ‘ मूक मोर्चा’काढला.हे आंदोलन निश्चितच योग्य आहे, न्याय मिळवण्यासाठी आणि हत्येच्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी करणे आवश्यक आहे आणि न्यायही मिळेलच.भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतलेल्या भूमिकेचं मी समर्थन आणि स्वागतच करतो.पण यामध्ये,मराठी महिला कलाकार प्राजक्ता माळी यांचं नाव विनाकारण गोवण्यात येत आहे. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय निराधार आरोप लावले जात आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. केवळ मराठी कलाकार आहेत म्हणून नव्हे तर कोणत्याही महिलेची अशा पद्धतीने मानहानी करणं चुकीचं आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे.महिलांचा सन्मान हे आपलं कर्तव्य आहे.
संतोष_देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करावं मात्र, या कलाकार मंडळींवर आरोप लावणं आणि त्यांची बदनामी करणं हे पूर्णपणे अनुचित आहे.
सर्व संबंधित लोक या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करतील, तसंच लावण्यात येणारे आरोप थांबवतील आणि त्या कलाकारांची माफी मागतील अशी अपेक्षा आहे.’