‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर छत्रपती शिवेंद्रराजे म्हणतात…
दिल्लीत काल (12 जानेवारी) भाजप नेते भगवान गोयल यांनी लिहलेल्या 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. या पुस्तकावरुन राजकीय वातावरण तापले आहे.
सातारा : “मोदी आपली तुलना महाराजांसोबत करणार नाहीत. कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना मराठी माणसांच्या भावना माहित आहेत. त्यामुळे त्यांचा नक्कीच या प्रकरणाशी संबंध नसेल”, असे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendra Raje Bhosale) म्हणाले. भाजप नेते भगवान गोयल यांनी लिहलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे काल (12 जानेवारी) दिल्लीत प्रकाशन करण्यात आले.. या पुस्तकावरुन राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendra Raje Bhosale) यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे करायला सांगितले असेल, असे मला वाटत नाही. मोदी आपली तुलना महाराजांसोबत करणार नाहीत. कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना मराठी माणसांच्या भावना माहित आहेत. त्यामुळे त्यांचा नक्कीच या प्रकरणाशी संबंध नसेल. मात्र, हे पुस्तक आल्यानंतर एक संधी विरोधकांना मिळाली आहे. पक्षामध्ये काही उत्साही आणि अतिउत्साही कार्यकर्ते असतात. त्यांच्या अशा वागणुकीमुळे पक्ष नेतृत्वावर टीका होते. पक्षश्रेष्ठींनी अशा उत्साही कार्यकर्त्यांना समज दिली पाहिजे”, असे शिवेंद्रराजे म्हणाले.
चिडचीड करण्यापेक्षा राजीनामा देऊन भूमिका घ्या, संजय राऊतांचा संभाजीराजे, उदयनराजेंना सल्ला
“पक्षश्रेष्ठी आणि अमित शाह यांनी याप्रकरणी लक्ष घालावे. हे पुस्तक थांबवावं. अशाप्रकारच्या गोष्टी होऊ नये की ज्याच्यामुळे पक्ष नेतृत्वावर टीका करण्याची संधी लोकांना मिळेल. काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून अशी चूक होऊ नये, अशी माझी पक्षश्रेष्टींकडे विनंती आहे. पक्षश्रेष्ठींनी लक्ष घालून या संपूर्ण गोष्टीला पूर्णविराम द्यावा”, असे शिवेंद्रराजे म्हणाले.
“छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा नंतरच्या काळातील स्वातंत्र्य सेनानी यांची कुणाचीही तुलना आपल्या कुणासोबत होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक वेगळी प्रतिमा आहे. त्यांनी स्वत: ती निर्माण केली आहे. नरेंद्र मोदी यांनी जगासमोर भारताची एक वेगळी प्रतिमा उभी करुन दाखवली आहे”, असेदेखील शिवेंद्रराजे म्हणाले.