Vinayak raut : फडणवीसांच्या रडगाण्याशी आम्हाला घेणेदेणे नाही, विनायक राऊतांचा टोला
सावरकर प्रश्नी देवेंद्र फडणवीसांचं रडगाणे सुरू आहे, त्यांच्याशी आम्हाला देणघेण नाही. अशा शब्दात विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
सिंधुदुर्ग : राज्यात पुन्हा सावरकरांवरून भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. सावरकरांच्या विषयावर बोलताना फडणवीसांनी शिवसेनेवर तोफ डागली. शिवसेनेला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टीका केल्यानंतर शिवसेनेकडून आता तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. देवेंद्र फडणवीसांना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. याआधी अनेकदा सावरकरांवरून भाजप आणि शिवसेनेत खडजंगी झाल्याचं पहायला मिळालं आहे आणि आता पुन्हा तोच वाद सुरू झाला आहे.
फडणवीसांच्या रडगाण्याशी देणेघेणे नाही
सावरकर प्रश्नी देवेंद्र फडणवीसांचं रडगाणे सुरू आहे, त्यांच्याशी आम्हाला देणघेण नाही. अशा शब्दात विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेचे जे दोन खासदार निलंबित झालेले आहेत, त्यातील अनिल देसाई हे अद्याप दिल्लीत गेलेले नाहीत. तर प्रियंका चतुर्वेदी यांनी सावरकरांबद्दल एक चकार शब्द काढला नाही उलट सिपीएमचे खासदार जे कोणी बोलले आहेत, त्यांच्याविरोधात प्रियंका चतुर्वेदींनी आवाज उठवला आणि आम्ही सगळ्यांनीच त्याचा धिक्कार केला. तरीही देवेंद्र फडणवीस यांचं रडगाणे सुरू आहे, त्याच्याशी आम्हाला देणघेण नाही, असं विनायक राऊत म्हणालेत.
सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना
आता मला भगवा भाजपचा आहे हे सांगावं लागतं, शिवसेनेला भगव्याचा मान, आणि सन्मान राहिला नाही. सावरकरांचा रोज अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना मांडीला मांडी लावून बसली आहे. अशी खरमरीत टीका फडणवीसांनी केली आहे. संसदेत माफी मागा म्हटल्यावर माफी मागायला आम्ही सावरकर आहोत का? असं बोलताना निर्लजांनो तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असंही फडणवीस म्हणालेत. त्यालाच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.