Uddhav thackeray | ‘कोण चुकीच बोललं, मग ते तुमच्या…’ शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
Uddhav thackeray | खेकडे कुठली धरण पोखरतात, ते सुद्धा शिंदे गटाच्या मंत्र्याने सांगितलं?. उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी करुन शिवसेना फोडणाऱ्या शिंदे गटावर जोरदार प्रहार केला आहे.
मुंबई : “गेल्यावर्षी मुसळधार पावसात माझ्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेलं नाही. खेकड्यांनी धरण फोडलं. ते धरणातच बसले होते. मातीमध्ये… शेवटी खेकडा हा खेकडाच असतो. त्याला कितीही सरळ चालवण्याचा प्रयत्न केला तरी तो तिरकाच चालतो” अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. खासदार संजय राऊत यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी करुन शिवसेना फोडणाऱ्या शिंदे गटावर जोरदार प्रहार केला आहे. महाविकास आघाडीच सरकार कोसळलं, त्याला खेकड्यांनी धरण फोडलं असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘त्यांनी सुद्धा आदराने बोलावं’
आता उद्धव ठाकरे यांच्या टीकेला शिंदे गटाचे आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “उद्धव ठाकरेंकडून त्यांनी संयमाने बोलावं अशी अपेक्षा असते. त्यांनी जर संजय राऊतांसारखी भाषा वापरली, तर त्यांना ते शोभत नाही. वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देतोय. त्यांनी चांगल्यारितीने बोलावं. आम्ही त्यांच्याविषयी आदराने बोलतो, त्यांनी सुद्धा आदराने बोलावं” असं दीपक केसरकर म्हणाले.
‘उद्धव ठाकरे म्हणजे धरण नाही’
“काहीवेळा प्रत्येक जण संयम पाळतोच असं नाही.. कोणी चुकीच उत्तर दिलं, तर ते त्यांच्या मनाला लागू शकतं” असं दीपक केसरकर म्हणाले. “उद्धव ठाकरे म्हणजे धरण नाही. धरण अभेद्य असतं, मातीची धरणं खेकडे पोखरु शकतात. भरभक्कम धरणं म्हणजे बाळासाहेबांचे विचार हे भरभक्कम धरणासारखे आहेत. ते कधीही तुटू शकत नाहीत” असं दीपक केसरकर म्हणाले. ‘पंतप्रधान बनण्याची इच्छा असू शकते’
“बाळासाहेबांनी कायम देशाला मार्गदर्शन केलं. आपण त्या मार्गापासून वेगळे झालात. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पंतप्रधान बनण्याची इच्छा असू शकते. हा त्यांचा विषय आहे, मला त्यावर बोलायचं नाही. वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र येऊन लढा उभारू शकत नाहीत. लढा देशहितासाठी असतो. आज देशाच हित पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आहे” असं केसरकर म्हणाले.