‘कोकण सम्राटांनी’ चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली; विनायक राऊतांचा राणेंवर प्रहार
काम पूर्ण झालं नाही तर एमआयडीसी चिपी विमानतळ प्रकल्पाचा ताबा घेईल | Vinayak Raut Narayan Rane
सिंधुदुर्ग: स्वत:ला कोकणसम्राट म्हणवणाऱ्यांनी चिपी विमानतळाचं कंत्राट आयआरबी कंपनीला देऊन वाट लावली, अशा शब्दांत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर प्रहार केला. नारायण राणे (Narayan Rane) यांनी दळभद्री आयआरबी कंपनीचे लाड पुरवण्यासाठी चिपी विमानतळाचे कंत्राट त्यांना दिले, असे राऊत यांनी म्हटले. (Shivsena MP Vinayak Raut take a dig at BJP leader Narayan Rane)
ते शनिवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चिपी विमानतळाचे काम एमआयडीसीला दिले असते तर शिर्डी विमानतळाप्रमाणे ते एव्हाना पूर्ण झाले असते. मात्र, नारायण राणे यांनी हे कंत्राट आयआरबीला देऊन संपूर्ण प्रकल्पाची वाट लावली. आता मागे लागून ते काम आम्ही पुर्ण करून घेतोय. डिजीसीएच्या सुचनेप्रमाणे धावपट्टीचं काम पूर्ण न झाल्याने या विमानतळाला हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाही.
त्यामुळे आता आम्ही आयआरबी कंपनीला इशारा दिला आहे. काम पूर्ण झालं नाही तर एमआयडीसी चिपी विमानतळ प्रकल्पाचा ताबा घेईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, हे करताना विमानतळाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.
राणेंच्या कारकिर्दीत फक्त 14 टक्के काम
चिपी विमानतळाचे काम आम्ही पूर्ण केलं. भाजप खासदार नारायण राणेंच्या कारकिर्दीत चिपी विमानतळाचे काम केवळ 14 टक्के झालं होतं. मात्र आम्ही ते काम शंभर टक्के पूर्ण केले. त्यामुळे आता विमान वाहतूक सुरु करणार आहोत, अशी माहिती मध्यंतरी खासदार विनायक राऊतांनी दिली होती.
उद्धाटनाचा मुहूर्त पुढे ढकलला
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून 23 जानेवारीला चिपी विमानतळाचे उद्घाटन केले जाणार अशी माहिती समोर येत होती. या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि भाजपचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असेल, असे कार्यक्रमाच्या पत्रिकेत लिहिण्यात आले होते.
संबंधित आय. आर. बी. कंपनीने याबाबतची माहिती दिली आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मोठ्या कालावधीनंतर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसणार होते. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र या उद्धाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.
संबंधित बातम्या :
चिपी विमानतळाचं उद्घाटन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर येणार
चिपी विमानतळाचं उद्धाटनाचा मुहूर्त पुढे ढकलला, कारण काय?
(Shivsena MP Vinayak Raut take a dig at BJP leader Narayan Rane)