किती दिवस तळवे चाटत राहणार आहात? चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या, नाही तर स्वतः पायउतार व्हा, उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
मुंबई :बाबरी मशीद पाडली तेव्हा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) तिथे नव्हते, शिवसैनिकही नव्हते असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्याने शिवसेना (Shivsena) आणि भाजपमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ४० शिवसैनिक आमदारांना आव्हान दिलंय. आणखी किती दिवस तुम्ही भाजपचे तळवे चाटत राहणार? बाळासाहेबांचा, शिवसेनेचा हा अपमान […]
मुंबई :बाबरी मशीद पाडली तेव्हा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) तिथे नव्हते, शिवसैनिकही नव्हते असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्याने शिवसेना (Shivsena) आणि भाजपमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ४० शिवसैनिक आमदारांना आव्हान दिलंय. आणखी किती दिवस तुम्ही भाजपचे तळवे चाटत राहणार? बाळासाहेबांचा, शिवसेनेचा हा अपमान कसा सहन करू शकता, आधी चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्या नाही तर तुम्ही स्वतः राजीनामा द्या, अशी मोठी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
‘नपुंसक नेतृत्व..’
उद्धव ठाकरे यांनी त्या वेळची आठवण सांगितली. बाबरी मशीद पाडल्यावर भाजपचे लोक पळून गेले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी एक शब्द उच्चारला होता. नपुंसक नेतृत्व. एखाद्या कार्यकर्त्याला सांगायचं आणि घटना घडल्यावर पळून जायचं. असं नेतृत्व लाभल्यावर या देशात हिंदुत्व कधी उभंच राहू शकणार नाही.. असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.. मात्र आता ही सगळी जणं हळूवार पणे बिळातून बाहेर पडतायत. त्यावेळेला सगळे शाळेच्या सहलीला गेले होते. कुणी म्हणतं मी या तुरुंगात होतो, कुणी त्या म्हणतं त्या तुरुंगात होतो. मग इतकी वर्ष का गप्प होतात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केलाय.
‘शिवसैनिकांनी पेटलेली मुंबई वाचवली’
बाबरी पडल्यावर ज्या दंगली उसळल्या, तेव्हा शिवसेना सत्तेत नव्हती. पण मुंबई वाचवली ती शिवसैनिकांनी. गुजरात-अहमदाबादमध्ये जे घडलं, त्यात पोलिसांचा वापर केला गेला. आमच्या हातात पोलीस नव्हते. पोलीस, लष्कर, देशद्रोही शिवसैनिकांना मारत होते. पण तो जो लढा होता, ते देशद्रोह्यांविरोधात होता, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.
भाजपचं हिंदुत्व नेमकं काय आहे? भाजपची कीव येते. एका बाजूला मोहन भागवत मशिदीत जातात. हे सगळे मदरशांमध्ये जाऊन कव्वाली गाणारेत. दुसरीकडे बाबरीपण आम्हीच पाडली सांगतायत. म्हणजे यांचं हिंदुत्व नेमकं काय आहे? जसं आम्ही सांगतो शेंडी जानव्याचं हिंदुत्व आमचं नाही. ते राष्ट्रीय पातळीवरचं आहे. तसं भाजपने एकदा स्पष्ट करावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय.
चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्या..
जे मिंधे सत्तेसाठी लाचार होतायत. यांचे पाय चाटायला गेले. त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेतला पाहिजे. किंवा स्वतः राजीनामा दिला पाहिजे. आता हे कुणाला जोडे मारणारेत? स्वतः जोड्याने तोंड फोडून घेणारेत…बाळासाहेबांचा अपमान सहन करूनही काय चाटायचं ते चाटत रहा.. आम्ही बघायला येत नाहीत. एवढं बोलल्यानंतर बाळासाहेबांचे विचार नाहीत. ज्या मस्तीत चंद्रकांत पाटील बोलतायत, त्यांनी आडवाणींची मुलाखत पहावी. त्यात ते म्हणाले होते, ‘घुमटावर चढलेले शिवसैनिक ऐकण्याच्या मानस्थितीत नव्हते…’
त्या केसमध्येही आरोपी १, २ अशी नोंद आहे. मी स्वतः लखनौ कोकर्टात गेलो होतो. त्यावेळी सीबीआय चौकशी, कोर्ट कचेर्या झाल्या आहेत. आता राम दर्शनाला दुनिया जाते. आम्ही गेलो होतो तेव्हा तो मुद्दा थंड बस्त्यात गेला होता. जेव्हा मी म्हणालो अयोध्येला जाणार तेव्हा वीजा लखलख होत्या. शिवजन्मभूमीची माती घेऊन मी गेलो होतो. पण राम मंदिर करण्याचं धाडस मोदींनी केलं नाही. तो निकाल कोर्टाने दिला. आता बिळातून बाहेर निघालेले उंदीर त्याचं श्रेय घेत आहेत. किती दिवस तळवे चाटत राहणार आहात? शिवसेना हा पवित्र शब्द उच्चारण्याची लायकी नाही. हे आता कुणाला जोडे मारणार आहेत? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय.