Nana Patole : ‘महात्मा गांधीजींचा वध नथुराम गोडसेने केला’, नाना पटोलेंचं धक्कादायक विधान
आजा महात्मा गांधींबाबत (Mahatma Gandhi) बोलताना नथुराम गोडसेने (Nathuram Godase) महात्मा गांधींचा वध केला असं वक्तव्य केल्याने पुन्हा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे,
कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी, मुंबई : गेल्या काही दिवासांपासून नाना पटोले (Nana Patole) त्यांच्या खळबळजनक विधानांमुळे वादात सापडले असताना, आज नाना पटोलेंनी पुन्हा एक खळबळजनक विधान केलंय. आज महात्मा गांधींबाबत (Mahatma Gandhi) बोलताना नथुराम गोडसेने (Nathuram Godase) महात्मा गांधींचा वध केला असं वक्तव्य केल्याने पुन्हा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण हत्येऐवजी वध या शब्दावर अनेकांनी आक्षेप घ्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे नाना पटोले पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावरून नाना पटोले भाजपच्या टीकेचा सामना करत आहेत. भाजपने अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारीही केल्या आहेत, तसेच दोन दिवसांपूर्वीच भाजपने नाना पटोलेंना मनोरुग्णाचे औषध पाठवले होते आणि आता नानांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र गोडसेच्या मते गांधींचा वध झाला, अशा अर्थाने मी ते वाक्य बोललो होते, असे स्पष्टीकरणही नाना पटोलेंनी भाषणानंंतर दिलं आहे.
नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आजच्याच दिवशी नथुराम गोडसे नावाच्या आतंकवाद्याने वध केला. महात्मा गांधी संपले असे हिंदुत्ववादी व्यवस्थेला वाटत असेल पण महात्मा गांधी आजही त्यांच्या विचाराने जिवंत आहेत व त्यांचे विचार भविष्यातही जिवंत राहतील. गांधी विचार देशाने तसेच जगाने स्विकारलेला आहे तो कधीही संपणारा नाही. हा देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचारानेच चालेल, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, खा. राहुलजी गांधी यांनी गांधी पुण्यतिथीनिमित्त केलेले ट्विट योग्यच आहे. गांधी विचारांना संपवण्याचा अनेकदा प्रयत्न केला गेला पण गांधी विचार या देशात रुजलेला आहे. हाच विचार आजच्या पिढीत रुजवण्याचा आपण संकल्प करुयात. या देशाला गांधींजीनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले. गांधीजींची अहिंसेची शिकवण जगाने स्विकारलेली आहे. गांधी एक व्यक्ती नसून तो विचार आहे तो विचारच देशाला तारणारा आहे. ब्रिटिशांविरोधात मोठा संघर्ष केल्यानंतर मिळालेले हे स्वातंत्र्य आज धोक्यात आल्याची परिस्थिती देशात निर्माण झाली आहे त्यामुळे स्वातंत्र व संविधान अबाधित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. महात्मा गांधी यांच्याबद्दल खोटा इतिहास सांगून त्यांना खलनायक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा अपप्रचार थोपवण्यासाठी सजग रहा, सतर्क रहा. स्वातंत्र्याच्या लढाईप्रमाणे गांधी विचाराची लढाई सुरु ठेवा, असे आवाहनही पटोले यांनी केले. मात्र हे बोलताना वध हा शब्द वापरल्याने पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता आहे.