“संजय राऊत यांनी नैतिकतेचे धडे देणं म्हणजे दाऊदने मुंबई पोलिसांना कायद्याचे धडे देण्यासारखं!”
MLA Nitesh Rane on Sanjay Raut : भाजप आमदाराने खासदार संजय राऊतांवर घणाघात केलाय. भाजप आमदाराने दाऊदचा दाखला देत ठाकरे गटावर टीका केलीय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरही त्यांनी टीका केलीय. तसंच नागपुरात आलेल्या पुरावरही त्यांनी भाष्य केलंय. वाचा सविस्तर...
सिंधुदुर्ग | 26 सप्टेंबर 2023 : संजय राऊत आज नैतिकता, शपथ अशी मोठमोठे शब्द वापरत आहेत. अशा बरबटलेल्या लोकांकडून अशी मोठी वाक्य ऐकणं म्हणजे दाऊदने मुंबई पोलिसांना कायद्याचे धडे देण्यासारखं आहे. शिवसेनेचा घात संजय राऊतने केला आहे. सूर्याजी पिसाळ असलेल्यांनी नैतिकतेबाबत बोलू नये, असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलंय. नितेश राणे यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र डागलंय.
सध्या होत असलेल्या मुसळघार पावसामुळे नागपूरमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. यावर विरोधकांनी टीका केलीय. आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही यावर टीका करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी नागपूरमध्ये आलेल्या पुरावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसंच अंबादास दानवे यांनीही राज्य सरकारला सवाल केलेत. त्याला आता नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. अंबादास दानवे यांना आता फार नागपूर आठवत आहे. नागपूर मधील विकास काम बघा आणि मातोश्रीवर जाऊन मालकाला जाब विचारा की मुंबईत काय केलं म्हणून…, असं नितेश राणे म्हणालेत.
आगामी अधिवेशनात अंबादास दानवे विरोधी पक्षनेते राहणार नाहीत. अनिल परब मातोश्रीवर जाऊन रडत आहेत. दानवेंनी वायफळ बडबड बंद करावी.कार्टून बघायचं असेल तर मालकाचा मुलाजवळ बघा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक झाली. यात इंडिया आघाडीचा लोगो प्रदर्शित होणार होता. मात्र तो झाला नाही. त्यावर नितेश राणे यांनी टीका केली आहे. तुमच्या इंडियाचे साधे चिन्ह तरी बनवू शकलात काय? नितीश कुमार इंडियाच्या बैठकीत का नव्हते?, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.
सध्या विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकाण्याचं काम सुरू आहे. मोठंमोठे शब्द वापरले जात आहेत. पण त्याने अध्यक्षांवर प्रभाव टाकला जाऊ शकत नाही. संजय राऊतांवर कारवाई होणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची एकही चूक विरोधकांना सापडत नाहीये. सत्ताधाऱ्यांना खेचण्याची प्रथा विरोधकांची आहे. तसं महाविकास आघाडीचे लोक करत आहेत. पण त्यातून काहीही साध्य होणार नाही, असं नितेश राणे म्हणालेत.