45 गावांच्या सरपंचांचा झेडपी विरोधात संताप; आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात चाललंय काय?
सांगोला तालुक्यातील 45 गावांच्या शेकाप पक्षाचे सरपंच हे सोलापूर जिल्हा परिषदेत आले. संबंधित ग्रामपंचायतीने केलेला ठराव ग्राह्य धरला जात नाही. असे सांगत अप्रत्यक्षपणे आमदार शहाजीबापू पाटील यांवर निशाणा साधला आहे.
सोलापूर : आमदार शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) यांच्या मतदारसंघातील 45 गावांचे सरपंच झेडपीत धडकले. दलित वस्ती सुधारणासाठी निधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. काय झाडी, काय डोंगर या डायलॉगमुळे राज्यभर चर्चेत आलेले शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मतदार संघातील शेकाप पक्षाचे 45 गावचे सरपंच सोलापूर जिल्हा परिषदेत (Zilla Parishad) आले होते. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला. 45 गावचा विकास खुंटला आहे. जिल्हा प्रशासनकडून दलित वस्ती सुधारणासाठी समान निधी मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आमच्या कामात आमदाराचा हस्तक्षेप कशाला असा सवाल त्यांनी यावेळी केला. जिल्हा परिषद समाज कल्याणमधील दलित वस्तीच्या कामांचा आणि आमदारांचा काय संबंध असा सवाल देखील यावेळी आलेल्या सरपंचानी उपस्थित केला आहे.
अधिकाऱ्यांची घेतली भेट
सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांशी भेट घेतली. त्यानंतर 45 गावांच्या सरपंच यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांची भेट घेतली.
सांगोला तालुक्यातील 45 गावांच्या शेकाप पक्षाचे सरपंच हे सोलापूर जिल्हा परिषदेत आले. संबंधित ग्रामपंचायतीने केलेला ठराव ग्राह्य धरला जात नाही, असे सांगत अप्रत्यक्षपणे आमदार शहाजीबापू पाटील यांवर निशाणा साधला आहे.
चर्चेतून मार्ग काढण्याचे आश्वासन
सरपंचांनी दिलेल्या कामकाजाची यादी ग्राह्य धरली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांनी समाजकल्याण अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढू असे सांगितले.
सांगोला तालुक्यातील 45 गावांचे सरपंच आल्याने सोलापूर जिल्हा परिषदेत खळबळ उडाली होती. शेकापचे नेते चंद्रकांत देशमुख व बाबा करांडे यांनी आपली मतं व्यक्त केली.