त्यांनी प्रेमविवाह केला, वडिलांनी मुलीला प्रियकराच्या घरून उचलून नेले, त्यानंतर असा झाला राडा
नाशिकला जाऊन या दोघांनी कोर्ट मॅरीज केलं. परांडा पोलीस ठाण्यात जबाब दिला. तिच्या आईवडिलांनीही जबाब दिला. त्यानंतर ओमकार प्रेयसीला घेऊन घरी आला.
संदीप शिंदे, प्रतिनिधी, माढा, (सोलापूर) : सैराट चित्रपट तुम्ही पाहिला असेल. या चित्रपटाशी साधर्म्य साधणारी अशी घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील महादपूर गावात घडली. मुलाच्या प्रेमविवाहातून मुलाच्या कुटुंबीयांना मारहाण झाली आहे. मुलीचे कुटुंबीय मुलाच्या घरी आले. त्यांनी मुलाच्या कुटुंबीयांना मारहाण केली. त्यानंतर आपल्या मुलीला घेऊन निघून गेले. ओमकार जळके असं प्रेमविवाह करणाऱ्या मुलाचं नाव आहे. मुलीचे कुटुंबीय ११ मे रोजी रात्री एक वाजता आले. दरवाज्यावर दगडं मारली. दार तोडून मारामारी केली. माझ्या पत्नीला मारहाण करून घेऊन गेले, असं ओमकार सांगतो.
नाशिकमध्ये केले कोर्ट मॅरीज
मुलीच्या गावात येण्या-जाण्यामुळे बघून प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर या दोघांमध्ये मोबाईलवर बोलणं झालं. ओमकारनं प्रेयसीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. नाशिकला जाऊन या दोघांनी कोर्ट मॅरीज केलं. परांडा पोलीस ठाण्यात जबाब दिला. तिच्या आईवडिलांनीही जबाब दिला. त्यानंतर ओमकार प्रेयसीला घेऊन घरी आला.
माझ्या पत्नीला परत आणून द्यावे
११ मे रोजी रात्री एक वाजता मुलीचे वडील काही जणांना घेऊन आले. आधी प्रेम केलं. नंतर लग्नही केलं. माझी पत्नी मला मिळवून द्यावी, असं आता ओमकारचं म्हणणं आहे. त्यासाठी ओमकारने पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्र दिलं. त्यात त्यानं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचाही उल्लेख केला. माझ्या पत्नीला जीवे मारण्याच्या उद्देशाने ते घेऊन गेलेत. तिला मारहाण करू नये. तिला माझ्याकडे परत आणून द्यावे, अशी विनंती ओमकारने पत्राद्वारे केली आहे.
प्रियकराने दिला हा इशारा
माढा पोलिसांनी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही. माझी पत्नी मला परत मिळावी, अन्यथा मी बेमुदत उपोषणाला बसेन, असा इशारा या युवकाने आता दिला आहे.