सोलापुरात ट्विस्ट, अमोल कोल्हे भाजप नेते मोहिते पाटलांच्या भेटीला, मोठी राजकीय खेळी होण्याचे संकेत
राजकारणात कधी काय होईल? याचा काहीच भरोसा नाही. त्यामुळे भाजपमधला सोलापुरातला मोठा नेता उद्या शरद पवार गटाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवताना दिसला तर जास्त आश्चर्य वाटणार नाही, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. विशेष म्हणजे अमोल कोल्हे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भेटीमुळे या चर्चांना जास्त गती मिळताना दिसत आहे. आता या घडामोडी पाहता भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
सोलापुराच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतली आहे. अमोल कोल्हे यांनी आज सोलापुरच्या अकलूज येथे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. अमोल कोल्हे आणि मोहिते पाटलांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांचा माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून जाहीर करण्यात आलेले उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध आहे. रणजितसिंह नाईक हे माढ्याचे विद्यमान खासदार आहेत. भाजपकडून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पण धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्याच्या जागेवर दावा केला होता. आपण दावा केल्यानंतरही भाजपने उमेदवारी न दिल्याने मोहिते पाटील नाराज झाले आहेत.
रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटलांनी कार्यकर्त्यांच्या आणि काही महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठकादेखील घेतल्या होत्या. रणजितसिंह यांच्या उमेदवारीला अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर यांचाही विरोध आहे. त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान भाजप नेते गिरीश महाजन हे धैर्यशील मोहिते पाटील यांची समजूत काढण्यासाठी गेल्या आठवड्यात अकलूज येथे दाखल झाले होते. गिरीश महाजन मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर त्यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी मोहिते पाटलांच्या समर्थकांनी गिरीश महाजन यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली होती. यावेळी गिरीश महाजन यांनी मोहिते पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण मोहिते पाटील ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.
मोहिते पाटील शरद पवार गटाचे उमेदवार असणार?
या सर्व घडामोडी एकीकडे घडत असताना आज अमोल कोल्हे यांनी मोहिते पाटील यांची भेट घेतली. विशेष म्हणजे अमोल कोल्हे यांनी शिवरत्न बंगल्यावर धैर्यशील मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे भाजपमध्ये नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या साथीने लोकसभा लढवणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
दरम्यान, अमोल कोल्हे यांनी मोहिते पाटील यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. राष्ट्रवादी शरद पवार गटाची लवकरच लोकसभा मतदारसंघाची यादी जाहीर होईल. यामध्ये माढ्याबाबत आपली वेट अँड वॉचची भूमिका आहे. तसेच राज्यात जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीच्या येतील, असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
“अकलूजमध्ये पाहुण्यांचा विवाह सोहळा होता. त्यानिमित्ताने आलो होतो आणि विजय दादांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या घरी आलो आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले. तसेच काही घडामोडी घडत आहेत त्या पूर्ण झाल्या की उमेदवारांची यादी लगेच जाहीर होईल, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. अजित पवार फार मोठे नेते आहेत. त्यांच्याविषयी मी वेगळं भाष्य करण्याची गरज नाही. मी निष्ठेने एका जागी आहे. हे मायबाप जनता जाणते आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले.
“वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देशातल्या संविधानाच्या विषयी भूमिका मांडली होती आणि संविधान वाचवण्यासाठी ही भूमिका कुठल्या पक्षाच्या स्वार्थासाठी नाही तर देशाच्या हिताची आहे, असा दावा अमोल कोल्हे यांनी केला. तसेच मोहिते पाटील यांनी माढामधून निवडणूक लढवावी ही भावना सर्वसामान्य जनतेची आहे. सर्वसामान्य लोकांचं हे म्हणणं आहे”, असादेखील दावा अमोल कोल्हे यांनी केला.
“संघर्षाच्या काळात शरद पवार गट धडाडीने महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतायेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी हाती असावी, अशी भावना मी अकलूज मध्ये आल्यानंतर कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत”, असंही अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.