Gunratna Sadavarte : गुन्ह्यांची यादी वाढता वाढता वाढे! सोलापुरात सदवर्तेंविरोधात आणखी एक गुन्हा
Gunratna Sadavarte Solapur : राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात सदावर्तेंविरोधात गुन्हे दाखल होण्याचं सत्र सुरु झालेलं आहे. ते काही थांबायचं नाव घेत नाहीये.
सोलापूर : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात सदावर्तेंविरोधात गुन्हे दाखल होण्याचं सत्र सुरु झालेलं आहे. ते काही थांबायचं नाव घेत नाहीये. राज्यात सातारा पोलिसांकडून कोल्हापूर पोलिसांकडे (Kolhapur Police) गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा देण्यात आला. सदावर्तेंना कोल्हापूर सत्र न्यायालयानं पोलीस कोठडीही सुनावली. त्यानंतर आता सोलापुरात (Solapur Police) सलग दुसऱ्या दिवशी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी सदावर्ते यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पद्धतीचा गुन्हा सातारा, आणि कोल्हापुरातही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता सोलापुरातील चावडी पोलीस ठाण्यात सकल मराठा समाज संघटनेच्या माऊली पवार यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
दोन दिवसांत दोन गुन्हे
चावडी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन 153 अ, 153 ब, पोलिस अप्रीतीची भावना चेतवणे, अधिनियम कलम 3 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 20 एप्रिल रोजी सोलापुरातल्या याच फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदावर्ते यांच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल झाला होता. आता 48 तासांच्या आत आणखी एक गुन्हा सदावर्तेंच्या विरोधात दाखल झाला आहे.
सध्या ताबा कोल्हापूर पोलिसांकडे
गुणरत्न सदावर्ते यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला होता. त्यानंतर त्यांना कोल्हापूर कोर्टासमोर हजर करण्यात आलं. त्यावेळी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे आणि फिर्यादींच्या वतीनं वकील शिवाजीराव राणे यांनी कोर्टात बाजू मांडली. तर सदावर्ते यांच्या बाजूनं पीटर बारदेस्कर यांनी युक्तिवाद केला होता.
कोल्हापूर पोलिसांकडे का गेला ताबा?
कोल्हापूर पोलिसांकडे सदावर्तेंचा ताबा येण्याआधी त्यांना सातारा पोलिसांच्या हवाले करण्यात आलं होतं. मात्र सातारा जिल्हा सत्र न्यायालयानं बुधवारी गुणरत्न सदावर्ते यांना दिलासा दिला होता. गिरगाव कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांना देण्यात आला होता.
सातारा जिल्हा सत्र न्यायालयानं सदावर्तेंचा जामीन मंजूर केल्यानंतर तातडीनं कोल्हापूर पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा मिळवण्यासाठी मागणी केली होती. त्यांनी गिरगाव कोर्टानं सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर सदावर्ते यांना कोल्हापूर पोलिसांच्या हवाले करण्यात आलं होतं. आता गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी वाढतच असल्याचं दिसत असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल होण्याचं सत्र सुरुच आहे.