नाफेडकडून कांदा खरेदी होत नसेल तर…; राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला हा इशारा
पहिल्यांदा नाफेड कांदा खरेदी करू दे. रॅक उपलब्ध करून कांद्याचा उठाव झाला. मग अनुदान संदर्भातदेखील अंतिम निर्णय होईल, असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.
सोलापूर : कांदा खरेदीच्या संदर्भात नाशिकमध्ये प्रश्न उपस्थित झाला होता. मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेतं नाफेडला कांदा खरेदीच्या सूचना केलेल्या होत्या. सोलापूरमध्ये जर नाफेडतर्फे खरेदी होत नसेल तर चौकशी करण्यात येईल. लगेचच कार्यवाही केली जाईल, असं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. अनुदानासंदर्भात निर्णय अजून व्हायचा आहे. नाफेडने खरेदी केली किंवा व्यापाऱ्यांची मागणी आहे की रॅक्स उपलब्ध होत नाहीयेत. जादा रॅक उपलब्ध करून दिले. कांद्याचा उठाव झाला तरी आपोआप भाव वाढण्यात मदत होईल. स्वतः मुख्यमंत्र्यांनी अनुदान संदर्भात सांगितले आहे की, सरकार याबाबतीत सकारात्मक आहे. पहिल्यांदा नाफेड कांदा खरेदी करू दे. रॅक उपलब्ध करून कांद्याचा उठाव झाला. मग अनुदान संदर्भातदेखील अंतिम निर्णय होईल, असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.
सात महिन्यांत शेतकऱ्यांना इतके कोटी
शेवटी विरोधी पक्षाचे काम आहे की प्रश्नाचे राजकारण करणे. महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्याला कोणतीही मदत झाल्याचे आम्ही ऐकलं नाही. गारपीट, अवकाळी पाऊस या बाबतीत मागच्या सरकारने एक रुपया देखील दिला नाही. उलट आमच्या सरकारने मर्यादा वाढवून दिल्या. एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त देण्याचा निर्णय घेतला असल्याचंही विखे पाटील यांनी म्हंटलं. राज्याच्या स्थापनेपासून हे पहिले सरकार आहे जे शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील आहे. 12 हजार कोटी रुपये सरकार आल्यापासून मागील सात महिन्यात शेतकऱ्यांना दिलेत.
याचं वैफल्य ठाकरे गटात दिसते
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी विखे पाटील म्हणाले, राजकारणामध्ये मतभेद असतात. वैचारिक मतभेद असतात. राजकीय मतभेद असतात. पण थेट प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत मजल जाते. यातून ठाकरे सेनेचे नैराश्य दिसून येते. आतापर्यंत जो त्यांनी वरचष्मा गुंडगिरीच्या माध्यमातून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला कुठेतरी आता छेद जातोय. सामान्य माणूसदेखील आता मोकळेपणाने बाहेर पडतायत. बाळासाहेबांच्या शिवसेनेशी देखील लोकं जोडले जात आहेत. मनसेसोबत लोकं जोडले जातं आहेत. त्याचं वैफल्य ठाकरे गटात दिसतंय, अशी टीकाही विखे पाटील यांनी केली.
निकालानंतर विचारमंथन होत असते
कसबा पोटनिवडणुकीबाबत ते म्हणाले, पक्ष कमिटी, उपमुख्यमंत्री हे त्या बाबतीत आपली भूमिका मांडतील. कोणत्याही राजकीय पक्षांमध्ये अशा निवडणुका झाल्यानंतर विचार मंथन हे होतच असतं. एखादा पराभव जेव्हा होतो तेव्हा अशा बातमी होतात. पण त्याबाबत काय कारण मिमांसा आहे, यासंदर्भात आमचे नेते देवेंद्र फडणवीस, पक्षाचे वरिष्ठ करतील, असंही त्यांनी सांगितलं.