Ajit Pawar | शरद पवार-अजित पवार गुप्त बैठकीबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? Video
Ajit Pawar | महामंडळ वाटपाच्या फॉर्म्युल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं? शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त बैठक कोणाच्या बंगल्यात आणि कुठे झाली? बैठकीला अजून कोण उपस्थित होतं?
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गट. अजित पवार गट राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला आहे. शरद पवार गट विरोधी पक्षामध्ये आहे. भविष्यातील राजकीय गणित लक्षात घेता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही गटांच मनोमिलन व्हावं, अशी भाजपाची इच्छा आहे. स्वत: अजित पवार यांच्याकडून यासाठी प्रयत्न केला जातोय. त्यांनी स्वत: आमदारांसह शरद पवार यांची भेट घेतली आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची बातमी आहे.
शनिवारी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती आहे. कोरेगाव पार्कमध्ये उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात ही भेट झाल्याची माहिती आहे. जयंत पाटील आणि 2 आमदार या बैठकीला उपस्थित होते अशी माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्या दिशेने जाणार?
दरम्यान काका-पुतण्यामध्ये काय चर्चा झाली? ते अद्याप समजू शकलेलं नाहीय. शऱद पवार यांनी सत्तेत सहभागी व्हावं, अशी अजित पवार यांची इच्छा आहे. पण शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मनात संभ्रम ठेवू नका, मी भाजपासोबत जाणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे नेमकं भविष्यात काय घडणार? राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्या दिशेने जाणार? याकडे सगळ्यांच लक्ष आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील 35 पेक्षा जास्त आमदार आहेत.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. ते सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. “मला या भेटीबद्दल काहीही माहिती नाही. भेटीबद्दल काहीही तपशील माझ्याकडे नाही. भेट झाली, नाही झाली, किती वेळ चर्चा झाली? याबद्दल काहीही माहित नाही. त्यामुळे मी तुमच्या ज्ञानात भर घालू शकत नाही. त्याला मी सक्षम नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला काय आहे?
महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला काय आहे? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “एक समन्वय समिती तयार केलीय. ही समन्वय समिती ठरवेल. कुठलं महामंडळ, कुणाला द्यायच अजून काही ठरलेलं नाही”