Leopard Attack : रमत गमत चालत असलेल्या बिबट्याचा व्हिडीओ व्हायरल, ग्रामस्थ शेतात जायला घाबरतायेत
अनेक शेतकऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वनविभागाला (forest department) केली आहे. पण उसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बिबट्याला पकडण्यात अडचण येत आहे.
सोलापूर : माढ्यातील (Solapur madha) शेडशिंगे, पिंपळनेर, चव्हाणवाडी गावच्या परिसरात बिबट्याने (Leopard) दहशत माजवली आहे. शेडशिंगे गावातील नाईकवाडी वस्तीवरील शेतकऱ्याच्या एका शेळीवर देखील हल्ला करुन ठार केले आहे. वनविभागाने देखील तिन्ही गावात पाहणी केली असून पाहणीत हे बिबट्याचे ठसे असल्याचे समोर आले आहे. ऊसाचे क्षेत्र अधिक असल्याने त्यामुळे या तिन्ही गावातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. या संदर्भातला बिबट्या भटंकती करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून शेतकरी शेताकडे जायला घाबरत आहे. अनेक शेतकऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वनविभागाला (forest department) केली आहे. पण उसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बिबट्याला पकडण्यात अडचण येत आहे.
पुण्यात उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ली
त्याचबरोबर पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील उत्तम शिंदे यांच्या शेतात उसाची तोडणी चालू असताना ऊसतोड कामगारांना 10 ते 15 दिवस वय असलेले बिबट्याचे 4 बछडे आढळून आल्याने ऊसतोड कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखाण्याच्यावतीने ऊसतोड चालू असताना कामगारांना 4 पिल्ले दिसल्याने ऊसतोड कामगारांनी ऊसतोड थांबवली आहे. या बछड्यांना वन विभागाने निगराणी खाली ठेवले असून स्थानिक नागरिकांनी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
मेळघाटात सुद्धा बिबट्याने धुमाकूळ घातला आहे, नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा..
मेळघाट परिसरात वाघ आणि बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे.धारणी तालुक्यातील हतिदा, बिजूधावडी, मोगर्दा गावात शेतकऱ्यांची जनावरे वाघांनी फस्त केली आहे. इतकचं नाही तर घोटा, बोथरा,चित्री गावात देखील जनावरे ठार केलीत. या वाघ आणि बिबट्यांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे शेतात जाणे कठीण झाले आहे. यावर मेळघाट आमदार राजकुमार पटेल यांनी मुख्य वनसंरक्षक अधिकाऱ्याला पत्र दिले आहे. वनविभागाने वाघ आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावलेत, त्या पिंजऱ्यांमध्ये वाघ येऊन पिंजरा तोडून पळालेत असा आरोप राजकुमार पटेल यांनी केलाय. त्यामुळे वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करा अशी विनंती देखील राजकुमार पाटील यांनी केली.