ग्लोबल टिचर डिसले गुरूजींनी माफी मागितल्याचा दावा, अवधानाने बोलल्याची पत्रात कबुली-ZP CEO
ग्लोबल टिचर डिसले गुरुजींनी सोलापूर जिल्हा परिषदेकडे (Solapur Jilha Parishad) पत्राद्वारे माफी मागितल्याचा ZP सीईओ दिलीप स्वामींनी दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा डिसले गुरूजी चर्चेत आले आहेत. याबाबत डिसले गुरूजींनी मात्र अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.
सागर सुरवसे, प्रतिनिधी सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून परदेशी जाण्यावरून झालेल्या वादामुळे रणजितसिंह डिसले गुरूजी (Disle Guruji) पुन्हा चर्चेत आले होते. कारण अधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य न करता अपमान केल्याचा आरोप डिसले गुरूजी यांनी केला होता. हा वाद माध्यमांपर्यंत पोहोचल्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याची दखल घेतली होती आणि डिसले गुरूजींच्या परदेशी जाण्यावर शिक्कामोर्तब केले होते. काही त्रुटी आल्या असतील तर त्या दूर करून, त्यांच्या सुट्टीवर मार्ग काढून कोणत्याही परिस्थितीत डिसले गुरूजींना परदेशी पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर हा वाद काहीसा संपला होता, मात्र आता या प्रकरणात नवं ट्विस्ट आलं आहे, कारण ग्लोबल टिचर डिसले गुरुजींनी सोलापूर जिल्हा परिषदेकडे (Solapur Jilha Parishad) पत्राद्वारे माफी मागितल्याचा ZP सीईओ दिलीप स्वामींनी दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा डिसले गुरूजी चर्चेत आले आहेत.
जिल्हा परिषद सीईओ काय म्हणाले?
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात डिसले गुरुजींनी प्रसारमाध्यमासमोर मी अनवधानाने बोलल्याची कबुली पत्राद्वारे दिली आहे, असे या सीईओ स्वामींचे सांगणे आहे. तसेच त्यांनी सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक पानाचे पत्र लिहून यापुढे माध्यमासमोर न जण्याची हमी दिल्याची सीईओंनी माहिती दिली आहे. परदेशी शिष्यवृत्तीसाठी अधिकाऱ्यांनी पैशांची मागणी केली, तसेच मानसिक त्रास दिल्याचा डिसले गुरुजींनी दावा केला होता. या वक्तव्यानंतर सोलापूर जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी यांनी खुलासा करण्याबाबत डिसले गुरुजींना नोटीस दिली होती, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
डिसले गुरूजींनी कॉल घेतला नाही
जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामींनी अशी प्रतिक्रिया दिल्यांतर आम्ही डिसले गुरूजींची बाजूही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी कॉल घेणे टाळले आहे. ग्लोबल टिचर डिसले गुरूजींचा जगभर डंका आहे. मानाचा ग्लोबल टिचर पुरस्कार जिंकल्यानंतर डिसले गुरूजी घराघरात पोहोचले आहेत. त्यांनीच अधिकाऱ्यांबद्दल अशा तक्रारी केल्यानंतर साऱ्या राज्याचं लक्ष या प्रकरणाने वेधून घेतलं होतं. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनाही या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी लागली होती. आता सीईओंच्या या दाव्यानंतर नेमकं खरं कोण बोलतंय? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. लवकरच डिसले गुरुजींची सीईओंच्या दाव्यावर अधिकृत प्रतिक्रिया येईल आणि हा संभ्रम दूर होईल हीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधीत बातम्या :
सावधान | ऑनलाईन बँकिंग करत असाल तर जरा इकडे लक्ष द्या, आणि आधी तुमचं बँक अकाऊंट चेक करा…
7700 mAh बॅटरी, मोठा डिस्प्ले, Motorola Moto Tab G70 बाजारात, आजपासून विक्रीला सुरुवात
Free Fire Redeem Codes : ऑनलाईन गेमिंगमधून शानदार रिवॉर्ड्स, कसा करावा क्लेम?