ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे? मग तुम्हाला ‘या’ अर्जाची पोचपावती गरजेची
राखीव जागांवर निवडणूक लढवण्यासाठी नामनिर्देशपत्र दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाबाबतचा पुरावा सादर करण्याबरोबरच एक हमीपत्रही देणं गरजेचं आहे.
मुंबई: राज्यातील 34 जिल्ह्यांमधील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्यात राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सवलत देण्यात आली आहे. जात वैधता प्रमाणपत्राऐवजी पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मूभा देण्यात आलीय. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही माहिती दिली आहे. (Some documents are required to contest Gram Panchayat elections)
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 30 डिसेंबर 2020 पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. राखीव जागांवर निवडणूक लढवण्यासाठी नामनिर्देशपत्र दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाबाबतचा पुरावा सादर करण्याबरोबरच एक हमीपत्रही देणं गरजेचं आहे. विजयी झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं जाईल, असं हमीपत्रात नमूद करावं लागणार आहे.
मनसेही ग्रामपंचायतीच्या रिंगणात
राज्यातील महाविकास आघाडी, भाजप, वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता मनसेनेही ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी येत्या 23 डिसेंबरपासून उमदेवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्षांना आपल्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा उमेदवार उभा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुका पूर्ण ताकदीनं लढवण्याच्या सूचनाही राज यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.
15 जानेवारीला मतदान
राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार
विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत.
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.
Ravi Rana | सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न : रवी राणाhttps://t.co/YsIpmfUNO3 #Ravirana #Maharashtra @raviranabjp
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 14, 2020
संबंधित बातम्या:
तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर
Some documents are required to contest Gram Panchayat elections