राज्यभरात लसीकरणाला सुरुवात; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसं होतंय लसीकरण

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचं उद्धाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर महाराष्ट्रातही लसीकरण मोहीम सुरु झाली आहे.

राज्यभरात लसीकरणाला सुरुवात; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसं होतंय लसीकरण
Corona-vaccine
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 2:48 PM

मुंबई : कोरोनाला थोपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (16 जानेवारी) लसीकरणाच्या मोहिमेचा शुभारंभ केला. त्यानंतर महारष्ट्रातही प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या राज्यस्तरीय मोहिमेला सुरुवात झाली. मुंबईतील बीकेसी लसीकरण केंद्रावरुन या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून यावेळी मुख्यमंत्र्यांसह पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. कोरोना लसीकरण हे क्रांतिकारी पाऊल असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. (statewide Corona vaccination Started; Find out how vaccinations are going in your district)

कोल्हापुरातील तरुणीला पहिल्या लशीचा मान

कोल्हापूरच्या सेवा रुग्णालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली. अक्षता चोरगे यांना पहिली लस देण्यात आली. विशेष म्हणजे अक्षता चोरगे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवशी अनोखं गिफ्ट मिळाल्याने अक्षता चोरगेही उत्साहात आहेत. “मी लस घेतली. मला काहीच त्रास झालेला नाही. लसीकरणानंतरही सोशल डिस्टन्सिंग ठेवा, मास्क वापरा आणि वारंवार हात धुवा, हे तीन नियम पाळले तर आपण कोरोनावर मात करु” असा विश्वास अक्षता चोरगे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

सांगलीत इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत लसीकरणास सुरुवात

इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यात सुरूवातीला 9 केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यात साधारणत: 31 हजार 800 डोस प्राप्त झाले आहेत.

सांगली शहर आणि ग्रामीण भागात शासकीय 8 हजार 959 तर खासगी 4 हजार 395 अशा एकूण 13 हजार 354 आरोग्य कर्मचाऱ्यांची तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात 5 हजार 777 शासकीय तर 7 हजार 361 खासगी अशा एकूण 13 हजार 138 आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात 26 हजार 492 आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. यासाठी 92 शितसाखळी केंद्र तयार केली असून 140 आयएलआर आणि 126 डीप फ्रीजर उपलब्ध आहेत. सांगली ग्रामीण व शहरी भागासाठी 362 लस टोचक सज्ज असून 75 AEFI किट उपलब्ध आहेत. महानगरपालिका क्षेत्रात 72 लस टोचक सज्ज असून 21 AEFI किट उपलब्ध आहेत.

जालन्यात आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते कोरोना लसीकरण मोहिमेचे उद्धाटन

कोरोनाला थोपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लसीकरणाच्या मोहिमेचा शुभारंभ केला. महारष्ट्रातही प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. त्यानंतर आता राज्यातील सामान्याना लस कधी मिळणार यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केलंय. “ज्यांना लस नाही, त्यांनाही लस मिळणार आहे. आता आरोग्य कर्मचारी, नंतर फ्रन्टलाईन वर्कर आणि नंतर ज्येष्ठ नागरिकांना लस देऊ,” असे टोपे म्हणाले. ते जालना येथे लसीकरण मोहिमेचे उद्धाटन केल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी टोपे म्हणाले की, ” कोव्हिड योद्ध्यांनी आपल्या सर्वांचे प्राण वाचवले. 11 महिने त्यांनी जीव धोक्यात घालून मेहनत केली. त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांना आधी लस दिली. त्यानंतर फ्रन्टलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक, नंतर सामान्यांना लस दिली जाईल.”

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत उस्मानाबादेत लसीकरणास सुरुवात

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत उस्मानाबाद येथे कोरोनावरील लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी ओमराजे म्हणाले की, कोरोनाची लस ही सुरक्षित असून लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा. कोरोना लढाईत आरोग्य अधिकारी-कर्मचारी हे सहभागी होते, त्यामुळे त्यांना सर्वात आधी लस दिली जात आहे. लस दिली असली तरी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाविरुद्धची लढाई अजून संपलेली नसून ती जिंकायची असेल तर नियमांचे पालन करावेच लागेल, असे आवाहनही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे.

सोलापुरात लसीकरण मोहिमेला प्रारंभ

सोलापूर शहरात शहरात तीन ठिकाणी तर ग्रामीण भागात आठ ठिकाणी लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात डॉक्टर सुनीता अग्रवाल यांना कोरोनाचा पहिली लस देण्यात आली. हॉस्पिटलमधील परिचारिका राजश्री माने यांच्या हस्ते ही लस देण्यात आली आहे. यावेळी वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि सिव्हिल हॉस्पिटलचे आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील तब्बल 34 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. आज आज 11 ठिकाणी 100 लसी देण्यात येणार आहेत.

गोंदियात कोरोना लसीकरणाला सुरूवात, पहिल्या दिवशी 300 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस

संपूर्ण राज्यासह गोंदिया जिल्ह्यातदेखील आज कोरोना लसीकरणाला सुरवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, तिरोडा उपजिल्हा रुघ्णालय आणि देवरी उपजिल्हा रुग्णालयात दररोज 100 लोकांना लस टोचली जाणार आहे. गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल 35 वर्षे सेवा देणाऱ्या डॉक्टर राजेंद्र यांना पहिली लस तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशात तुरकर यांना दुसरी लस देण्यात आली.

गडचिरोलीत लसीकरण मोहीम सुरु

गडजिरोली जिल्ह्यातही लसीकरणाला सुरुवात झालेली असून यावेळी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका सारिका दुधे यांना सर्वात आधी लस देण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील चार लसीकरण केंद्रांवर आजपासून प्रतिदिन शंभर प्रमाणे दर दिवशी 400 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. आज लसीकरणाच्या शुभारंभप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगडमध्ये कोविड लसीकरण मोहिमेला सुरूवात

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगडमध्ये कोरोनावरील लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. रायगडमध्ये पहिल्‍या टप्‍प्‍यातील लसीकरणासाठी 9500 डोसेस उपलब्‍ध आहेत. जिल्‍हयात अलिबाग, पेण, पनवेल आणि कामोठे अशा चार ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. यावेळी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, नगराध्‍यक्ष प्रशांत नाईक, जिल्‍हाधिकारी निधी चौधरी, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा योगिता पारधी यांच्‍यासह आरोग्‍य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

रत्नागिरीत लसीकरणाला सुरुवात

रत्नागिरीमध्ये पाच आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक सई धुरी यांनी जिल्ह्यात सर्वात आधी लस टोचून घेतली आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 500 कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. जिल्ह्याला 16 हजार 360 डोस पुरवण्यात आले आहेत. 28 दिवसांच्या अंतराने दुसरा डोस दिला जाणार आहे.

नवी मुंबईत आज 400 जणांना लस

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी भाजप नेते संजीव नाईक, माजी महापौर जयवंत सुतार यांची उपस्थित होते. नवी मुंबई महापालिका वाशी सार्वजनिक रुग्णालय, ऐरोली रुग्णालय, डी. वाय. पाटील रुग्णालय, अपोलो रुग्णालय येथे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रात आज 100 जणांना लस दिली जात आहे. आज एकूण 400 जणांना लस दिली जाणार आहे. महापलिकेत कोरोनाच्या 21 हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. तर कोविड अॅपवर 21 हजार 80 आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 400 जणांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्यात 23 लसीकरण केंद्र

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आज कोरोनावरील लसीचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी पहिली लस घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर उपस्थित होते. जिल्ह्यातील 23 केंद्रांमध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. जिल्ह्यात एकूण 62 हजार आरोग्य कर्मचारी आहेत, त्या सर्वांना लस दिली जाणार आहे. लसीचे कुठलेही साईड इफेक्ट्स नसल्याचे कैलास पवार यांनी यावेळी सांगितले.

वसई-विरार महापालिकेतही लसीकरणाला सुरुवात

वसई-विरार महापालिकेतील इंडस्ट्रीयल लसीकरण केंद्रात आजपासून कोव्हिड लसीकरण सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्याला लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बोईसरचे आमदार राजेश पाटील, नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर, माजी महापौर प्रवीण शेट्टी, पालिका आयुक्त गंगाधरण डी. यांच्या उपस्थितीत कोव्हिड लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. आज पहिल्याच दिवशी आरोग्य विभागाच्या 100 लाभार्थ्याना कोव्हिडची लस देण्यात येणार आहे.

महापोरांच्या उपस्थितीत मीरा-भाईंदरमध्ये लसीकरण

मीरा-भाईंदर महानगरपालिकेत महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. मीरा भाईंदर महानगरपालिकेत एकूण लसीचे 8 हजार 200 डोसेस उपलब्ध झाले आहेत. महानगरपालिका अंतर्गत जम्बो कोविड केयर सेंटर, पंडित भीमसेन जोशी रुग्णालय आणि वोकहार्ड रुग्णालय या तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आलं आहे. या तिन्ही ठिकाणी 300 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. आतापर्यंत 6308 आरोग्य कर्मचाऱ्यांनी पालिकेत लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. आजपासून लसीकरणास सुरुवात झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणात सहभागी व्हावं: राजेश टोपे

पंतप्रधानांनी लसीकरणाबद्दलचा मौलिक संदेश देशाला दिला. आरोग्यमंत्री म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वांनी लसीकरण करावं, असं आवाहन करतो. कोरोना लसीकरणात सर्वांचाच नंबर लागेल, कुणीही काळजी करण्याची गरज नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. सर्वांना वाटतं की लस मिळावी, मात्र, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य माणसांचा क्रमांक आल्यावर लस घेणार, प्राधान्यक्रमानुसार जेव्हा लस मिळेल तेव्हा लस घेणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. लसीकरणाची गरज आहे, त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. 8 लाख 50 हजार जणांची नोंदणी केली आहे. त्यामुळे 17 लाख 50 हजार डोस मिळणं गरजेचे आहे. राज्याला उर्वरित 7.5 लाख डोस मिळणं गरजेचे आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना त्याबाबत पत्र लिहिणार आहे, असंही टोपे म्हणाले.

या सर्व जिल्ह्यांसह तसेच महापालिकांसह परभणी, अकोला, वाशिम, मालेगाव आणि बुलडाण्यातही लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे.

संबंधित बातम्या

अदर पुनावालांनी टोचली लस, पंतप्रधान मोदी यांच्या विश्वासार्हतेच्या मुद्द्याला पाठबळ

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत लसीकरण मोहीम सुरु, पहिल्या लसीच्या मानकरी कोण?

(statewide Corona vaccination Started; Find out how vaccinations are going in your district)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.